मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अलीकडेच एका कॉन्सर्टमध्ये सर्व प्रेक्षकांना थक्क केलं आहे. या कॉन्सर्टमध्ये त्यांनी त्याच्या चाहत्यांना एक सुंदर सरप्राईज दिलं आहे. या शोमध्ये त्यांनी विकी कौशलच्या 'बॅड न्यूज' चित्रपटातील 'तौबा तौबा' हे लोकप्रिय गाणं गायलं. या गाण्याच्या सादरीकरणानं संपूर्ण सभा ही मंत्रमुग्ध झाली. या परफॉर्मन्सदरम्यान त्यांनी गाण्यातील काही स्टेप देखील केल्या.आशा भोसले यांचे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान 'तौबा तोबा'चा गायक करण औजलानं देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, 91 वर्षीय आशा भोसले यांनी गाण्यातील विक्की कौशलच्या हुक स्टेप रिपीट करून सर्वांना चकित केलं आहे.
आशा भोसलेनं गायलं तौबा तौबा गाणं :आशा भोसले यांचा डान्स पाहून कार्यक्रमाला उपस्थित चाहत्यांनी देखील आनंदानं उड्या मारल्या. हा व्हायरल व्हिडिओ 'तौबा तोबा' गायक करण औजलानं देखील पाहिला. करणनं व्हायरल झालेला व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. दरम्यान आशा भोसले यांच्या आवाजातील हे गाणे ऐकून त्यांचे अनेकजण कौतुक करत आहेत. तसेच करणनं शेअर केलेल्या पोस्टवर लिहिलं, "आशा भोसले जी, संगीताची जिवंत देवी. त्यांनी अलीकडेच 'तौबा तौबा' गाणं गायलं आहे. हे गाणं एका लहानशा गावात वाढलेल्या एका मुलानं लिहिलं आहे, ज्याला संगीताची पार्श्वभूमी आणि वाद्यांचे ज्ञान नाही. कोणतेही वाद्य न वाजवणाऱ्या व्यक्तीनं रचलेला राग.'