मुंबई : 2021 हे वर्ष शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप वाईट ठरलं होतं. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्या गेलं होतं. जामीन मिळण्यापूर्वी आर्यन खानला 25 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. आता यानंतर आर्यनला त्याच्यावरील सर्व आरोपातून निर्दोष मुक्त मिळाली आहे. दरम्यान त्यावेळी समीर वानखेडे हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर होते. ड्रग्ज प्रकरणी तपास करून त्यांनी आर्यन खानला अटक केली होती. आता अलीकडेच समीर वानखेडे यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख खानची चॅट लीक झाल्याबद्दल आणि आर्यनला सोडवण्यासाठी लाच घेतल्याचा आरोपावर त्यांनी एक खुलासा केला आहे.
समीर वानखडेवर चॅट लीकचा आरोप :एका मुलाखतीमध्ये समीर यांना विचारण्यात आलं की, शाहरुखच्या मुलाला अटक केल्यामुळे मीडियानं त्यांना टार्गेट केलं आहे का?, यावर वानखडे यांनी उत्तर दिलं, "मला टार्गेट करण्यात आलं, मी असं म्हणणार नाही. मी खूप भाग्यवान आहे असं, मी म्हणेन कारण मला मध्यमवर्गीयांचं प्रेम मिळालं. कोणी कितीही मोठा असला तरी, प्रत्येकानं नियम पाळले पाहिजेत. याप्रकरणी मला कसलाही पश्चाताप नाही. मला पुन्हा संधी मिळाली तर मी तेच करणार." पुढं त्यांना शाहरुख खानच्या चॅटबाबत विचारण्यात आलं, यावर त्यांनी म्हटलं, "न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिल्यामुळे मी यावर बोलू शकत नाही, मात्र समीर यांनी चॅट लीक केल्या नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. याशिवाय त्यांनी म्हटलं, "मी इतका कमकुवत नाही की, मी गोष्टी लीक करेल."