मुंबई - Anushka Sharma on Raksha Bandhan:अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांचा मुलगा अकायचं लंडनमध्ये या जगात स्वागत केलं. अनुष्का सध्या युनायटेड किंगडममध्ये तिच्या कुटुंबासह राहात आहे. 19 ऑगस्ट रोजी अकायनं बहीण वामिकाबरोबर त्याचं पहिलं रक्षाबंधन साजरं केलं. आता अनुष्कानं तिच्या मुलांच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या फोटोत दोन सुंदर राख्या दाखवल्या आहेत. या राख्यांमध्ये गाड्यांचं डिझाईन आहे. धाग्यानं बनवलेल्या या राख्यांवर कारच्या टायरसाठी काळी बटणं वापरण्यात आली आहेत.
अनुष्का शर्मानं शेअर केला फोटो :हा फोटो शेअर करताना अनुष्का शर्मानं कॅप्शन लिहिलं की, "हॅपी रक्षाबंधन." यासह तिनं दुहेरी गुलाबी हार्ट इमोजी शेअर केले आहेत. अनुष्का अनेकदा इन्स्टाग्रामवर अकाय आणि वामिकाची झलक शेअर करत असते. 8 ऑगस्ट रोजी तिनं तिच्या मुलाचा पॉपसिकल्स घेतानाचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोत दोन वाट्या दाखवण्यात आल्या होत्या. या फोटोमध्ये एका बाजूला अकायचा छोटा हात देखील दिसत होता. यापूर्वी, अनुष्कानं अकायच्या पहिल्या फादर्स डे सेलिब्रेशनची झलक शेअर केली होती. या फोटोत लहान अकाय आणि वामिकाच्या पावलांचे ठसे होते. हा रंगीबेरंगी फोटो शेअर करताना अनुष्कानं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "एखादा माणूस इतक्या गोष्टींमध्ये चांगला कसा असू शकतो, ही आश्चर्याची बाब आहे. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो बाबा."