मुंबई - मल्याळम अभिनेत्री मंजू वॉरियरचा 'फुटेज' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या या चित्रपटानं दाक्षिणात्य प्रेक्षकांना हादरवून टाकलं होतं. सस्पेन्स थ्रिलरच्या बाबतीत मल्याळम चित्रपट आघाडीवर असतात हे या चित्रपटानं पुन्हा सिद्ध केलं होतं. आता हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये रिलीज होणार असून बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप या चित्रपटाचं प्रेझेन्टेशन करणार आहे.
अलीकडच्या काळात अनुराग कश्यप हा साऊथ इंडियन सिनेमाच्या कार्यात बिझी झाला आहे. काही महिन्यापूर्वी हिंदी चित्रपटासृष्टील कामाचा कंटाळा आल्याचं वक्तव्य अनुरागनं केलं होतं. आगामी काळात साऊथमध्ये जाऊन काम करणार असल्याचंही त्यानं जाहीर केलं होतं. त्यानंतर अनुराग अनेक साऊथच्या चित्रपटातून झळकला. मुख्य म्हणजे 'महाराजा' आणि 'रायफल क्लब' या दोन साऊथच्या चित्रपटात तो व्हिलन म्हणून झळकला होता. त्याच्या या भूमिकांचं खूप कौतुकही झालं होतं. दाक्षिणात्य चित्रपटातून भूमिका करत असतानाच त्यानं आता 'फुटेज'सारखा चित्रपट प्रझेन्ट करण्याची जबाबदारीही उचलली आहे. आगामी काळात तो साऊथच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करताना दिसला तर त्यात आश्चर्य वाटलं जाऊ नये.