मुंबई - अभिनेता अनिल कपूरनं त्याचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांचं त्यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त स्मरण केलं. यानिमित्तानं त्यानं त्यांच्या काही आठवणी आणि जुने फोटोही शेअर केले आहेत. "आज माझ्या वडिलांचा 99 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या साधेपणानं, प्रामाणिकपणानं आणि आनंदानं केवळ त्यांची व्याख्याच केली नाही तर आपल्या सर्व जीवनाला अर्थ मिळवून दिला. त्यांचा सहवास खूपच चुंबकीय होता. त्यांच्या आठवणी मला मार्गदर्शन करतात. मला जगण्यात सामर्थ्य देतात आणि प्रेमाची उबही देतात. त्यांचा वारसा माझी प्रेरणास्थान आहे," असं अनिल कपूरनं म्हटलंय.
राज कपूर, आरडी बर्मन, शशी कपूर आणि परवीन बाबी यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांसह त्याचे वडील सुरिंदर कपूर फोटोत दिसत आहेत. मोनोक्रोम फोटोंची ही मालिका त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. फोटोवरुन लक्षात येत की सुरिंदर कपूर हे फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रतिष्ठीत व्यक्ती होते. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेताना आपल्याला जाणवेल की त्यांनी हिंदी चित्रपटाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांची मुलं अनिल कपूर, बोनी कपूर, संजय कपूर ही बॉलिवूडमध्ये खूप गाजलेली नावं आहेत. त्यांच्या जडणघडणीतही सुरिंदर कपूर यांचा मोलाचा वाटा आहे.
कोण होते सुरिंदर कपूर?
सुरिंदर कपूर यांना त्यांचे चुलत भाऊ पृथ्वीराज कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सामील होण्यासाठी मुंबईला आमंत्रित केलं होतं. त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1950 च्या दशकातील हिंदी चित्रपट आघाडीची नायिका गीता बाली यांच्याबरोबर केली होती. परंतु अभिनयामध्ये फारसी रुची न ठेवता निर्माता म्हणून त्यांनी या इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं. त्यांनी राजेश खन्ना यांना घेऊन त्यांनी 'शहजादा' हा चित्रपट बनवल्यानंतर त्यांच्या एस.के. इंटरनॅशनल फिल्म्सलाही मोठं यश मिळालं. त्यानंतर त्यांनी बनवलेल्या 'फूल खिले हैं गुलशन गुलशन' आणि 'बिकाश राव' चित्रपटांना अपयश आल्यानं ते कर्जबाजारी झाले होते. पण अपयशानं खचून न जाता त्यांनी आपली चित्रपट निर्मिती सुरू ठेवली.सुरिंदर कपूर यांची यशस्वी निर्मिती असलेल्या 'हम पांच', 'वो सात दिन', 'लोफर', 'जुदाई', 'सिर्फ तुम', 'हमारा दिल आपके पास है', 'पुकार', 'नो एंट्री' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली. या सर्व चित्रपटामध्ये त्यांचा मुलगा अनिल कपूर मुख्य भूमिकेत होता. त्यांचा धाकटा मुलगा संजय कपूर देखाल 'सिर्फ तुम'मध्ये मुख्य अभिनेता होता. वडील सुरिंदर कपूर यांच्या पावलावर पाऊल टाकत बोनी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये आपली कारकिर्द मोठी केली आहे.