मुंबई - देशभरात 'पुष्पा 2' चित्रपटाची मोठी क्रेझ आहे. लोक अनेक दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत आणि आता हा चित्रपट 5 डिसेंबरला चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून नुकतीच निर्मात्यांनी एक घोषणा करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जे पाहू आणि ऐकू शकत नाहीत अशा दिव्यांग प्रेक्षकांसाठी 'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनी ही घोषणा केली आहे. या चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी निर्मात्यांनी खास व्यवस्था केली आहे.
'पुष्पा 2' चित्रपट पाहून कुठे आणि कसा आनंद लुटता येईल?
मैत्री मूव्ही मेकर्सनी अलीकडेच 'द रुल'चा आनंद घेण्यासाठी खास टिप शेअर केली आहे. यानुसार जे लोक पाहू किंवा ऐकू शकत नाहीत अशांसाठी एक माहिती शेअर केली आहे. असे दिव्यांग प्रेक्षकही 'पुष्पा 2'चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत. या घोषणेनं 'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
'पुष्पा 2'चे रेकॉर्डब्रेक अॅडव्हान्स बुकिंग
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी अॅक्शन चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' रिलीजपूर्वी अनेक विक्रम प्रस्थापित करत आहे. पहिल्या दिवशीचा शो पाहण्यासाठी 'पुष्पा 2' च्या तिकिटांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. 'पुष्पा 2' च्या प्री-सेल्सने पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर चित्रपट रिलीज होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. निर्मात्यांनी गेल्या मंगळवारी 'पुष्पा 2' च्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल अपडेट शेअर केले. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये निर्मात्यांनी लिहिले आहे, ''पुष्पा 2'द रुलने अॅडव्हान्स बुकिंगसह 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. हा चित्रपट आजपर्यंतची अनेक रेकॉर्ड तोडत आहे आणि कमाई करत आहे. 'पुष्पा: द रुल' 5 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाची वाटचाल अभूतपूर्व अशीच राहिली आहे. यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत आहेत.