मुंबई - 'पुष्पा 2 द रुल'नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 12 दिवस पूर्ण केले असून या 12 दिवसांत 1400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान, हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची बातमी झळकली आहे. 12व्या दिवशी 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आणि चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होईल ते जाणून घेऊया.
'पुष्पा 2' ची 12 व्या दिवसाची कमाई
'पुष्पा 2' नं दोन आठवडे पूर्ण होण्याआधीच 1400 कोटींहून अधिकचा गल्ला जमा केला आहे. या चित्रपटानं भारतात 1000 कोटींचा उंबरा गाठला आहे. काल सोमवारपासून या चित्रपटाची कमाई थंडावली आहे. 'पुष्पा 2' च्या रिलीजच्या दुसऱ्या सोमवारी फक्त 27.75 कोटींचा सर्वात कमी व्यवसाय केला आहे. अशा प्रकारे 'पुष्पा 2' च्या जोरदार घोडदौडीला लगाम लागला आहे. चित्रपटाच्या कमाईत 63.77 टक्के घट झाली आहे. गेल्या रविवारी या चित्रपटानं 76.6 कोटींची कमाई केली होती. आता भारतातील चित्रपटाचं एकूण कलेक्शन 930.4 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे आणि जगभरात चित्रपटाने 1409 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'पुष्पा 2' ओटीटीवर कधी येईल?
दरम्यान 'पुष्पा 2' चित्रपट ओटीटीवर दिसणार असल्याची वेगानं पसरली आहे. 23 जानेवारीला नेटफ्लिक्सवर 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे काहीही स्पष्ट झालेलं नाही. रिलीजपूर्वी, 'पुष्पा 2' नं त्याचे डिजिटल अधिकार कोट्यावधी रुपयांना विकले आहेत. विशेष हे आहे की 'पुष्पा 2' रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांतच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटानं अनेक विक्रमांना गवसणी घातल्यामुळं अजूनही थिएटरमध्ये परत एकदा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. परंतु हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या बातमीनं त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर्वकाही नियोजनप्रमाणं घडलं तर हा सिनेमा येत्या 23 जानेवारीपासून ओटीटीवर येईल. याची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा सुरू झाली आहे.