मुंबई- अल्लू अर्जुनच्या दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयातील मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्याच्या वाढदिवसापूर्वीच ही ग्रेट भेट त्याला मिळाली आहे. दुबईतील कार्यक्रमासाठी आपल्या कुटुंबा बरोबर आलेल्या पुष्पा स्टार अल्लू अर्जुनने आनंदाने या कार्यक्रमाची झलक सोशल मीडियावर शेअर केली. एका पोस्टमध्ये, त्यानं खेळकरपणे त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी हिला विचारले की ती "दोन अर्जुन" हाताळू शकते का? स्वतःचा आणि त्याच्या मेणाच्या पुतळ्याच्या संदर्भात त्यानं ही मिश्कील विचारणा पत्नीला केली. अल्लु अर्जुनचा 8 एप्रिल रोजी 41 वा वाढदिवस साजरा होणार आहे.
इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये अल्लू अर्जुनने स्नेहाने घेतलेला सेल्फी शेअर केला आहे. स्नेहाने तो क्षण कॅमेऱ्यात कैद करताना तो त्याच्या मेणाच्या प्रतिकृतीच्या बाजूला अभिमानानं उभा राहिल्याचं दिसतंय. फोटो शेअर करताना अल्लू अर्जुनने लिहिले, "क्युटी! तू दोन अर्जुन हाताळू शकतेस का," त्यानंतर त्यानं इमोजी टाकलाय.
दुसऱ्या फोटोमध्ये अल्लू अर्जुन त्याची पत्नी आणि मुली बरोबर दिसत आहे, त्यांना प्रेमाने "खरा बट्टा बोमास" म्हणत आहे. हे शब्द आपल्याला नवखे वाटू शकतात पण 2020 मध्ये त्याच्या गाजलेल्या अला वैकुंठापुरमुलू या चित्रपटात बट्टा बोम्मा हे गाजलेलं गाणं होतं. नंतर या चित्रपटाचा हिंदीमध्ये शहजादा हा रिमेक बनवण्यात आला आणि यात कार्तिक आर्यननं अल्लु अर्जुनची भूमिका साकारली होती.