मुंबई- Allana Pandey gender diagnosis : अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण आणि यूट्यबर अॅलना पांडे हिला आई होण्याचे वेध लागलेत. तिने आपली प्रेग्न्सन्सी जाहीर केल्यानंतर ती आणि तिचा पती आयव्हर मॅकक्रे यांचा आनंद शिगेला पोहोचलाय. गुरुवारी अॅलनाचा बेबी शॉवर कार्यक्रम पार पडला. या स्टार स्टडेड समारंभाला फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. अनन्याचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता आदित्य रॉय कपूरनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
अॅलना पांडे पती आयव्हर मॅकक्रे बरोबर अमेरिकेत राहाते. तिथे त्यांनी गर्भलिंग निदान चाचणी केल्याचा कयास असल्यानं मनोरंजन जगतात एक नवं वादळ निर्माण झालंय. याचं बिंगही अॅलनाच्या बेबी शॉवर कार्यक्रमादरम्यान फुटलं. तिनं आपल्या या खास कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अॅलना आणि तिचा पती आयव्हर एका सजवलेल्या मोठ्या केक समोर बसलेले दिसतात. दोघेही केक कापण्यासाठी हातात ग्लास घेतात आणि केकवर ग्लास उलटा दाबून केक कापतात. केकचा आतून रंग निळा निघाल्यानंतर उपस्थित सर्वजण त्यांचे अभिनंदन करताना दिसतात. केकच्या आत असलेल्या रंगावरुन होणारे मूल 'मुलगा' की 'मुलगी' आहे हे ओळखण्याची एक पाश्चिमात्य पद्धत आहे. केकचा रंग गुलाबी निघाला तर 'मुलगी' आणि निळा निघाला तर 'मुलगा' असे याचे ठोकताळे आहेत. अॅलना पांडे आणि तिचा पती आयव्हर मॅकक्रेने केक कापल्यानंतर तो निळा निघाला याचा अर्थ त्यांना ही गोष्ट माहिती होती आणि त्यांनी गर्भलिंग निदान केल्याचेच स्पष्ट होते, असा दावा नेटीझन्सनी लावल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसतं. भारतात अशा प्रकारचे लिंगनिदान करण्यावर बंदी आहे. मात्र हे जोडपे अमेरिकेत राहात असल्यामुळे तिथे या गोष्टींना परवानगी आहे. पण हा कार्यक्रम भारतात होत असताना अशा प्रकारची गोष्ट उघड करणे ही बाब अनेकांना खटकली आहे. अनेक नेटिझन्स या प्रकारामुळे संतापले आहेत आणि आपली प्रतिक्रियाही देत आहेत.