वॉशिंग्टन - संयुक्त अमेरिकाचे माजी अध्यक्ष, बराक ओबामा दरवर्षी कलाप्रेमींसाठी शिफारस म्हणून त्यांच्या आवडीचं चित्रपट, पुस्तकं आणि संगीताची यादी शेअर करत असतात. ओबामा यांनी 2024 मधील त्यांना आवडलेलं चित्रपट कोणतं आहेत याचा खुलासा केला आहे. मराठमोळी अभिनेत्री छाया कदमची भूमिका असलेला आणि पायल कपाडिया दिग्दर्शित गोल्डन ग्लोब-नामांकित 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' हा चित्रपट बराक ओबामांच्या यंदाच्या शिफारसीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
एका भारतीय चित्रपटानं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या हृदयाच्या तारा छेडल्या आहेत. त्यांनी डेनिस विलेन्युव्हचा ड्युन पार्ट 2, शॉन बेकरचा अनोरा, एडवर्ड बर्गरचा कॉन्क्लेव्ह, माल्कम वॉशिंग्टनचा द पियानो लेसन यासह या वर्षी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असल्याचं म्हटलंय.
बराक ओबामा यांनी त्यांच्या एक्स ङँडलवर लिहिलंय की, "इथं काही चित्रपट देत आहे, जे मी या वर्षी पाहण्याची शिफारस करतो." यामध्ये त्यांनी यंदा पाहिलेल्या 10 चित्रपटांचा समावेश केला आहे. ज्यामध्ये 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' हा भारतीय चित्रपट अव्वल स्थानी असून इतर दहामध्ये अनुक्रमे 'कॉन्क्लेव्ह', 'द पियानो लेसन', 'द प्रॉमिस्ड लँड', डून पार्ट टू, 'अनोरा', 'दीदी', 'शुगरकेन', 'द कम्प्लीट अननोन' ' आणि 'द सीड ऑफ द सेक्रेड फिग' या चित्रपटांची वर्णी लागते.
कनी कुसरुती, दिव्या प्रभा आणि छाया कदम यांच्या भूमिका असलेला 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' हा चित्रपट फ्रान्समधील पेटिट केओस आणि चॉक अँड चीज आणि भारतातील अनदर बर्थ यांच्यातील अधिकृत इंडो-फ्रेंच सह-निर्मिती आहे.
या चित्रपटात प्रभा ही एक त्रासलेली परिचारिका आहे, जिला तिच्या परक्या पतीकडून अनपेक्षित भेट मिळते. अनु ही तिच्या प्रियकराशी जवळीक साधणारी तिची तरुण रूममेट आहे. समुद्रकिनारी असलेल्या शहराची सहल त्यांना त्यांच्या इच्छांचा सामना करण्यास भाग पाडते. या चित्रपटात कानी कुसरुती, दिव्या प्रभा आणि हृधू हारून यांच्या भूमिका आहेत, हे सर्व केरळचे मल्याळम भाषेतील कलाकार आहेत. यामध्ये छाया कदम या मराठमोळ्या अभिनेत्रीनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' चित्रपटानं कान चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित ग्रँड प्रिक्स जिंकून इतिहास रचला होता. याचा प्रीमियर 23 मे रोजी 2024 कान्स चित्रपट महोत्सवात त्याच्या बहुचर्चित 'स्पर्धा विभागात' झाला. 30 वर्षांत महोत्सवाच्या मुख्य विभागात प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. 1994 मध्ये शाजी एन करुणचा 'स्वाहम' हा स्पर्धा विभागात पोहोचणारा शेवटचा भारतीय चित्रपट होता.
यापूर्वी, पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' नं न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय आणि प्रतिष्ठित गोथम अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर ट्रॉफी देखील जिंकली होती. या चित्रपटाला ८२ व्या वार्षिक गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये एकूण दोन नामांकनं मिळाली आहेत.