मुंबई - Alia Bhatt and Sharvari Wagh : अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांनी यशराज स्पाय युनिव्हर्सच्या 'अल्फा' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचं दुसरं शेड्यूल काश्मीरच्या खोऱ्यात सुरू झालं आहे. 'अल्फा' चित्रपटाचं काश्मीरमध्ये 10 दिवसांचं शूट शेड्यूल असणार आहे. आलिया आणि शर्वरी नुकत्याच काश्मीरमध्ये पोहोचल्या आहेत. आता काश्मीरच्या खोऱ्यातून या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये दोघीही शूटिंगचा आनंद घेताना दिसत आहेत.
'अल्फा'चं शूटिंग काश्मीरमध्ये सुरू : शर्वरी वाघ आणि आलिया भट्टनं काश्मीर खोऱ्यातील हा फोटो इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये या दोघींनी एकमेकींचा हात धरून हार्टचा आकार बनवला आहे. फोटोत एक सुंदर धबधबा देखील दिसत आहे. शर्वरीनं काळ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे, तर आलिया ग्रे जॅकेटमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना आलिया आणि शर्वरीनं "लव्ह..अल्फा' असं लिहिलं आहे. आलिया आणि शर्वरीच्या फोटोवर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अभिनेता विकी कौशललाही हा फोटो आवडला आहे. या फोटोला 13 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय अनेकजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.