मुंबई - Agastya Nanda : दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आगामी 'इक्किस' चित्रपटामुळे आता चर्चेत आला आहे. त्यानं अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. यात तो तपकिरी खुर्चीवर बसलेला दिसला आणि त्याच्या मागे 21 असं लिहिलं होतं. दरम्यान 'इक्किस' चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र, वरुण धवन आणि जयदीप अहलावत यांच्याही विशेष भूमिका आहेत. अगस्त्यानं हा फोटो शेअर करताच चाहते खूप उत्साहित झाले, कारण 'द आर्चीज'नंतर अगस्त्यचा हा दुसरा चित्रपट आहे. 'इक्किस' चित्रपट परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटात 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्ध दाखवलं जाणार आहे.
अगस्त्य नंदाचा 'इक्किस' चित्रपट :अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यानं अभिनयालाच करिअर म्हणून निवडलं आहे. 'द आर्चीज'मध्ये त्यानं सुहाना खान आणि खुशी कपूर यांसारख्या नवोदित कलाकारांबरोबर काम केलं आहे. आता त्यानं 'इक्किस'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहेत. याशिवाय या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन हे करत आहेत. या चित्रपटाबाबत अद्यापही काही अपडेट आलेली नाही. मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाबाबत अपडेट येणार असल्याचा अंदाज आता लावला जात आहे.