मुंबई- IC 814: The Kandahar Hijack: 'नेटफ्लिक्स'वर नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सीरीज 'आयसी 814 द कंधार हायजॅक' ही अपहरणकर्त्यांच्या सांकेतिक नावांवरून वादात सापडली आहे. 1999 मध्ये झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या अपहरण झालेल्या फ्लाइटवर आधारित असलेल्या या वेब सीरीजमध्ये बर्गर, डॉक्टर, भोला, शंकर आणि चीफ यांसारखी काही अपहरणकर्त्यांची सांकेतिक नावं वापरली गेली होती. शंकर आणि भोला या नावांवर काहीजणांनी आक्षेप घेतला होता. 'आयसी 814 द कंधार हायजॅक' या वेब सीरीजमध्ये दहशतवाद्यांची हिंदू कोड नेम वापरल्यामुळे नेटिझन्सनी खूप विरोध केला होता.
अपहरणकर्त्यांची खरी नाव बदलवली : अपहरणकर्त्यांची खरी ओळख बदलणे म्हणजे ऐतिहासिक घटनांचं चुकीचं चित्रण करण्यासारखे असल्याचा युक्तिवाद केला गेला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी 'नेटफ्लिक्स इंडिया'च्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांना बोलावलं आणि या वेब सीरिजमधील काही गोष्टींबाबत सरकारची तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेब सीरीजमध्ये नावे बदलून भोला, डॉक्टर, बर्गर, शंकर आणि चीफ अशी ठेवण्यात आली होती. या अपहरणकर्त्यांची खरी नावे शाहिद अख्तर सईद, सनी, अहमद काझी, इब्राहिम अथर, जहूर मिस्त्री आणि शाकीर अशी आहेत. दहशतवाद्यांची नावे बदल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता.