मुंबई - प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मलिका राजपूत हिचे मंगळवारी संशयास्पद परिस्थितीत निधन झाल्याचं स्पष्ट झालंय. मिळालेल्या माहितीनुसार तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील एका खोलीत सापडला होता. स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अभिनेत्री मलिका राजपूतला विजय लक्ष्मी या नावानंही ओळखलं जातं.
प्रख्यात गायिका आणि अभिनेत्री मलिका राजपूतचा मृतदेह कोतवाली नगर येथील सीताकुंड परिसरात तिच्या राहत्या घरी आढळून आला. या घटनेने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून, शेजारी आणि प्रेक्षकही घटनास्थळी जमा झाले आहेत. या कठीण काळात ते मलिकाच्या आईला दिलासा देत आहेत. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, त्यांनी आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली आणि त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची व्यवस्था केली.
मृताची आई सुमित्रा सिंह यांनी आपल्याला प्रचंड धक्का बसल्याचं सांगितलं आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांना पूर्णपणे माहिती नव्हतं. त्या म्हणाल्या, "दार बंद होते, आणि दिवे चालू होते. आम्ही दार उघडण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते शक्य झाले नाही. शेवटी मी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि ती तिथे उभी असलेली दिसली. मी दार ठोठावले तेव्हा मला आढळलं की आमची मुलगी लटकत होती. मी ताबडतोब माझ्या पतीला आणि इतरांना फोन केला, पण खूप उशीर झाला होता," असं मलिका राजपूतच्या आईने मीडियाला सांगितलं.