मुंबई - शाहरुख खानच्या गाजलेल्या 'जोश' आणि गोविंदा स्टारर चित्रपट 'क्यूंकी मैं झूठ नहीं बोलता' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता शरद कपूर याच्याबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी शरद कपूरवर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. एका ३२ वर्षीय महिलेनं शरद कपूर याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या महिलेनं त्याच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिनेता शरद कपूरविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पीडित महिलेचा आरोप आहे की, शरद कपूरनं तिला आपल्या घरी बोलावून तिच्याशी गैरवर्तन केलं. त्यानं तिला अयोग्यरित्या स्पर्श केला, असं म्हणत त्या महिलेनं सांगितले की, ती फेसबुकच्या माध्यमातून शरद कपूरशी जोडली गेली होती. त्यानंतर हळूहळू ते व्हिडिओ कॉलवर बोलू लागले. महिलेने सांगितले की, यानंतर शरद कपूरनं तिला शूटिंगबद्दल बोलण्याच्या बहाण्यानं मीटिंगसाठी बोलावलं. शरद यानं पीडित महिलेला लोकेशन पाठवलं आणि तिला खार कार्यालयात बोलावलं होतं, असा दावा तक्रारीत करण्यात आलाय.