मुंबई - जर अभिनय शिकायचं असेल किंवा पक्का करायचा असेल तर नाटकांशिवाय पर्याय नाही असे जाणकार सांगत असतात. मराठी मालिकांमध्ये नवनवीन चेहरे प्रेक्षकांसमोर येत असतात परंतु जरी त्यांना लोकप्रियता मिळाली तरी अभिनय क्षेत्रात प्रगती व्हायला हवी हे ते जाणून असतात. म्हणूनच अनेक कलाकार जमेल तेव्हा नाटकाचा रस्ता पकडतात. त्यातीलच एक नट म्हणजे अभिनेता निखिल चव्हाण. लोकप्रिय मालिका 'लागिरं झालं जी' मधील 'विक्या' ही त्याची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. परंतु आता तो एक नव्हे तर दोन नाटकांमधून रंगभूमी गाजवत आहे. तो रंगमंचावर 'तू तू मी मी' या नाटकांतून रसिक प्रेक्षकांना भुरळ घालत होता आणि आता त्याने अजून एका नाटकात काम करण्याचं ठरवले आहे. आता तो प्रसिद्ध नाटक 'ऑल द बेस्ट' मधून प्रेक्षकाचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्याशी साधलेला हा खास संवाद...
प्रश्न: निखिल, तुम्ही सध्या दोन नाटकांमध्ये व्यस्त आहात. हा अनुभव कसा आहे?
निखिल चव्हाण: अगदी उत्तम! रंगभूमीवर परतल्याचा आनंद आहे. प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे, पण थिएटर ही एक वेगळीच जादू आहे. सिनेमा आणि वेबसीरिजपेक्षा रंगभूमीवरील थेट प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा अनुभव खूप वेगळा आणि उत्साहवर्धक असतो.
निखिल चव्हाण खास मुलाखत (ETv Bharat)
प्रश्न: ऑल द बेस्ट बद्दल सांगा. हे नाटक आधीपासूनच लोकप्रिय आहे, त्यात तुम्ही कोणती भूमिका साकारत आहात?
निखिल चव्हाण: ऑल द बेस्ट हे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. आधी या नाटकात अंकुश चौधरीने साकारलेली भूमिका आता मी करतोय. या नाटकाने अनेक तगडे कलाकार दिले आहेत. यात माझी भूमिका आंधळ्या तरुणाची आहे, जी खूप चॅलेंजिंग आहे. देवेंद्र पेम सर आणि मयुरेश यांनी तालमींमध्ये खूप मेहनत घेतली, त्यामुळे ही भूमिका निभावणे सोपे झाले.
निखिल चव्हाण खास मुलाखत (ETv Bharat)
प्रश्न: तुझं दुसरं नाटक तू तू मी मी बद्दल काय सांगाल?
निखिल चव्हाण: तू तू मी मी हे एक भन्नाट विनोदी नाटक आहे. या नाटकात मी भरत जाधव सरांसोबत काम करतोय, जे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. केदार शिंदे यांनी लिखाण आणि दिग्दर्शन केलंय, त्यामुळे नाटकाची ऊर्जा खूप जबरदस्त आहे. इथेही मी अंकुश चौधरीने आधी साकारलेली भूमिका करतोय, त्यामुळे जबाबदारी मोठी आहे.
निखिल चव्हाण खास मुलाखत (ETv Bharat)
प्रश्न: रंगभूमीवर परतताना काही दडपण वाटतंय का?
निखिल चव्हाण: थोडंसं नक्कीच! पण रंगमंच हे माझे पहिले प्रेम आहे. लोकांनी मला आजवर मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये स्वीकारलं, आता रंगभूमीवरही तसेच प्रेम मिळेल अशी आशा आहे. माझं प्रेक्षकांना आणि माझ्या चाहत्यांना आव्हान आहे की माझी नाटकं बघायला या, हसा, आनंद घ्या आणि नेहमीप्रमाणे मला तुमच्या प्रतिसादाने प्रेरित करा.
निखिल चव्हाणच्या अभिनय प्रवासात रंगभूमीचं योगदान मोठं आहे, आणि आता त्याच्या नव्या प्रयोगांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल!