मुंबई - Actor Jai Dudhane : मराठी टेलिव्हिजन मालिकाविश्वात आपली आपली एक स्टार सिस्टिम आहे. बऱ्याचदा टेलिव्हिजन स्टार्सची पॉप्युलॅरीटी सिनेमा स्टार्स पेक्षा जास्त असते. तसेच बऱ्याचदा बरेच कलाकार छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळवून मोठ्या पडद्यांची कास धरतात. असाच एक अभिनेता म्हणजे जय दुधाणे. जय दुधाणेने हिंदी रियालिटी शो स्प्लिट्सव्हीला १३ चे विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्यानं मराठी बिग बॉसमध्ये आपली छाप सोडली होती. तो 'गडद अंधार', 'वेडात मराठा वीर दौडले सात' सारख्या चित्रपटांतून झळकला आहे. मराठी कलाकार छोटा अथवा मोठ पडदा असा भेदभाव करीत नाहीत. त्याच अनुषंगानं जय दुधाणे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत अभिनेता जय दुधाणेची एन्ट्री होत असून तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी अनुक्रमे राया आणि मंजिरी या पात्रांच्या भूमिकांत असून जय दुधाणे इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत दिसणार आहे. जय घोरपडे अत्यंत स्वार्थी असून लाच खाल्याशिवाय एकही काम करीत नाही. अडचणीच्या वेळी मदत केल्याचं तो फक्त नाटक करतो परंतु लोकांना खोट्या केसेस मध्ये गोवण्यातही त्याचा हात असतो. तो कामात हुशार असला तरी त्याच्या इतर 'कामा'मुळे पंचक्रोशीत त्याचा दबदबा आहे.