मुंबईRatan Tata successor :सुप्रसिद्ध उद्योगपती तथा टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं काल रात्री निधन झालं. टाटा यांचं योगदान विसरता येणार नाही. रतन टाटा हे केवळ अब्जाधीश नव्हते, तर एक अशी व्यक्ती होती ज्यांनी टाटा समूहासोबत भारताला मजबूत केलं. त्यामुळं रतन टाटा यांच्या निधनानं सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. रतन टाटांची विनम्र जीवनशैली आणि टाटा ट्रस्ट्सच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक काम केले. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांचा वारसदार कोण होणार, असा प्रश्न उपस्थित होतोय. सुमारे 3 हजार 800 कोटी रुपयांच्या संपत्तीचं मालक रतन टाटा आयुष्यभर अविवाहितच राहिले.
उत्तराधिकारीबाबत चर्चा : रतन टाटा यांच्या उत्तराधिकारीबाबत आजच चर्चा सुरू झालेल्या नाहीत. या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. टाटा कुटुंबात एन. चंद्रशेखर हे 2017 पासून टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशिवाय, टाटा समूहाच्या विविध कंपन्यांमधील अनेक लोक आहेत, जे भविष्यात टाटा समूहात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना दिसण्याची शक्यता आहे.
टाटांचा वारसदार कोण होणार? :
नोएल टाटा :रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांचं दुसरं लग्न सिमोनशी झालं होतं. त्यांचा मुलगा नोएल टाटा हा रतन टाटा यांचा सावत्र भाऊ आहे. या नातेसंबंधामुळं ते रतन टाटा यांचा वारसा मिळवण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. नोएल टाटा यांना माया, नेव्हिल तसचं लेआसह तीन मुले आहेत. ते रतन टाटा यांचे उत्तराधिकारी होऊ शकतात.
माया टाटा : यापैकी माया टाटा या 34 वर्षांच्या आहेत. माया टाटा यांनी आपल्या करिअरची सुरुवात टाटा कॅपिटलमध्ये समूहाच्या प्रमुख वित्त सेवा कंपनीत विश्लेषक म्हणून केलीय. बायस बिझनेस स्कूल आणि वारविक विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर माया टाटा यांनी टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. या काळात, मायाचे धोरणात्मक कौशल्य तसंच दूरदृष्टीनं टाटा निओ ॲप लाँच करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
नेव्हिल टाटा :नेव्हिल टाटा 32 वर्षांचे असून आपल्या कौटुंबिक व्यवसायाला नवीन उंचीवर नेण्यात ते मोलाची भूमीका बजावत आहेत. नेव्हिल टाटा यांनी टोयोटा किर्लोस्कर समूहाच्या मानसी किर्लोस्करशी लग्न केलं आहे. ते स्टार बाजार, ट्रेंट लिमिटेडच्या आघाडीच्या हायपरमार्केट साखळीचे प्रमुख आहेत.
लिआ टाटा : नोएल टाटा यांची मोठी मुलगी लिआ टाटा 39 वर्षांची आहे. टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात त्या आपलं कौशल्य सिद्ध करत आहे. स्पेनमधील IE बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या लिआनी ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि पॅलेसेसमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. गेल्या दहा वर्षांपासून त्या हॉटेल उद्योगाशी संबंधित आहे. माया, नेव्हिल तसंच लिआ यांना टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टचे विश्वस्त बनवण्यात आलं आहे. टाटा समूहाशी निगडीत सेवाभावी संस्थेत प्रथमच तरुणांचा समावेश करण्यात आला आहे.
हे वाचलंत का :
- उत्पन्नातील सुमारे ६० टक्के हिस्सा दान ते स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, जाणून घ्या, रतन टाटांचे जीवनकार्य
- ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर अमेरिकेतील उद्योगजगतामध्ये व्यक्त केला शोक
- "गुडबाय मिस्टर टी", रतन टाटांच्या निधनानंतर उद्योगपतींनी व्यक्त केला शोक