मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार अजय देवगणनं शुक्रवारी अभिनेता म्हणून 33 वर्षे पूर्ण केली आहेत. 'फूल और कांटे' या त्याच्या पहिल्या चित्रपटाचा आज 33 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्तानं त्यानं एक सुंदर चिठ्ठी लिहून प्रेक्षकांसह चाहत्यांचे आभार मानले आहेत.
"फूल और कांटे चित्रपटातील एन्ट्रीपासून ते आजच्या सर्व गोष्टींपर्यंत, हा प्रवास काही सोपा नव्हता. मिळालेली प्रत्येक टाळी, प्रोत्साहन आणि प्रेमानं भरलेले आनंदाचे क्षण याबद्दल मी नेहमी ऋणी राहीन", असं त्यानं आपल्या इन्स्टाग्रामवरील चिठ्ठीत म्हटलंय. त्याने 'फूल और कांटे' चित्रपटातील त्याच्या आयकॉनिक एंट्री सीनचे प्रदर्शन करणाऱ्या शोपीसचा फोटोही याबरोबर शेअर केला आहे.
1991 मध्ये रिलीज झालेल्या 'फूल और कांटे' मध्ये मधु, अरुणा इराणी, जगदीप आणि अमरीश पुरी देखील कलाकार होते. कुकू कोहलीने त्याचे दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर अजयने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं आहे.
अलीकडेच तो रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' मध्ये दिसला होता.या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. या चित्रपटात त्यानं पुन्हा एकदा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बाजीराव सिंघम साकारला होता. सिंघम प्रँचाइजीला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यानं प्रेक्षकांचे आभार मानले होते. एएनआयशी बोलताना तो म्हणाला होती की, "आम्हाला इतके प्रेम दिल्याबद्दल मी प्रेक्षकांचा आभारी आहे. बऱ्याच काळापासून, चित्रपटांमधून पोलिसांना नेहमीच नकारात्मक दाखवले जात होते. सिंघम आणि गंगाजल हे असे चित्रपट होते ज्यांनी एक आदर्श पोलीस अधिकारी कसा असावा हे दाखवले. त्यानंतर, पोलिसांबद्दल सकारात्मक चित्रपट बनवण्याचा ट्रेंड बनला आहे."
सिंघम अगेनमध्ये करीना कपूर खान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्याही भूमिका आहेत. कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाबरोबर 'सिंघम अगेन'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. तरी देखील प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगली साथ दिली आणि 354 कोटींची कमाई केली.