हैदराबाद : अर्थसंकल्पासंदर्भात सखोल आर्थिक विश्लेषण जाणून घेण्याअगोदर आपण अर्थसंकल्प म्हणजे काय? त्याचा उद्देश काय? हे अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. अर्थसंकल्प ही एक आर्थिक प्रक्रिया आहे. यामध्ये सरकार संसदेला आणि जनतेला सरकारचे उत्पन्न, खर्च आणि कर्जाची माहिती देते.
केंद्रीय अर्थसंकल्पात मागील आर्थिक वर्षातील सरकारच्या आर्थिक कामगिरीचं पुनरावलोकन केलं जातं. सरकारनं किती कमावले?, किती खर्च केले? किती कर्ज घेतले? याची तपशीलवार माहिती यात दिली जाते. याव्यतिरिक्त, सरकार आगामी आर्थिक वर्षासाठी अंदाज प्रदान करते. अपेक्षित उत्पन्न, नियोजित खर्च आणि कोणतीही कमतरता पूर्ण करण्यासाठी अपेक्षित कर्जाची रूपरेषा देते. मूलत: अर्थसंकल्प हे सरकारच्या आर्थिक आरोग्याचं आणि योजनांचे प्रतिबिंब असतं.
अर्थसंकल्पाचं महत्त्व काय? :अर्थसंकल्प हा केवळ सरकारच्या निधीसाठी नाही तर थेट करदात्यांच्या पैशाशीदेखील संबंधित आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी एकदा म्हटल्याप्रमाणे, सरकारकडं नागरिकांच्या कमाईशिवाय दुसरा कोणताही पैसा नाही. जेव्हा सरकार खर्च करते, तेव्हा ते नागरिकांच्या बचतीतून कर्ज घेऊन किंवा त्यांच्यावर कर लावून करते. याचा अर्थ असा की कोणतीही वित्तीय तूट किंवा खर्च पूर्ण करण्यासाठी सरकार कर्ज घेते किंवा त्या कर्जात भर घालते. सरकारनं घेतलेल्या कर्जाची किंमत नागरिकांच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना शेवटपर्यंत मोजावी लागते.