हैदराबाद Gold Price Will Increase In India : सर्वसामान्य नागरिक गुंतवणूक करण्यासाठी सोनं खरेदीला प्राधान्य देतात. मात्र मागील काही काळापासून सोनं चांगलंच वधारलं आहे. सोन्याचा भाव 64 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. हा सोन्याचा उच्चांकी दर ठरला आहे. 'फेडरल रिझर्व्ह'ची आडमुठी भूमिका आणि सट्टा खरेदीतील न संपणाऱ्या तणावाचा भाव वाढीवर परिणाम होत असल्याची माहिती सराफा विक्रेते आणि विश्लेषकांनी दिली आहे.
सोन्याला देशात उच्चांकी दर :सोनं खरेदी करायला ग्राहकांची नेहमीच पसंती राहते. मात्र आता सर्वसामान्य नागरिकांचं सोनं घेण्याचं स्वप्न पूर्ण होण्यास मोठा अडथळा येत असल्याचं स्पष्ट होत आहे. आगामी काळात सोनं महागणार असल्याचे संकेत सराफा व्यावसायिक देत आहेत. याबाबत बोलताना रिद्धीसिद्धी बुलियन्स लिमिटेड (RSBL) चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी म्हणाले, "देशात सोन्याचा व्यवहार उच्चांकी भावानं होत आहे. सोन्याच्या किमती गेल्या दोन दिवसात 70 हजार रुपयाच्या वर पोहोचल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सोन्याच्या दरानं मोठा उच्चांक केला आहे. न्यूयॉर्क कम्युनिटी बॅनकॉर्प (NYCB) शेअर्स मागील आठवड्यात कोसळल्यानं सोन्याचे दर वधारले आहेत. अमेरिकेत बँकिंग संकट 2.0 ला गडद होण्यास चालना मिळाली आहे."
रुपयाच्या घसरणीमुळेही भारतात सोन्याच्या किंमतीचा उच्चांक :"सोनं महाग होणार असल्याच्या समजामुळं ग्राहक सोन्याच्या बाजारात उडी घेत आहेत. दुसरीकडं फेडची बेजबाबदार भूमिका, गुंतवणुकीची मागणी आणि मजबूत सट्टा बाजार हे किमतीला आधार देणारे घटक आहेत. त्यामुळं कमी कालावधीत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आता सोनं 65 हजार 500 रुपये स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. मात्र पुढं सोन्याचे दर वाढून ते 70 हजार रुपये 10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे," असंही कोठारी म्हणाले.
सोनं आगामी काळात गाठणार उच्चांक :भारतात सोनं महागलं आहे. त्यामुळं आगामी काळातही सोन्याची दरवाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जागतिक पातळीवरही सोनं महागलं आहे. "फेड दरांच्या जागतिक प्रभावामुळं सोन्याचे दर वधारले आहे. त्यामुळं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याची दरवाढ सुरुच आहे," अशी माहिती कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शाह यांनी दिली. सोन्याच्या किमतीत हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळं सोनं आगामी काळात उच्चांक गाठणार आहे. वर्षभरात सोनं 70 हजार रुपयाचा टप्पा पार करेल. वर्षाच्या अखेरीस 4 टक्क्यांपर्यंत दर खाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवून भविष्यात यूएस फेडकडून दर कपातीची चर्चा सुरू आहे. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास सोन्याच्या किमती वाढत राहतील, असा अंदाज आहे, असंही कॉलिन शाह यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा
- Jalgaon Gold Price : चांदीच्या दरात 2 हजार तर सोन्याच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ; भेटवस्तू देणाऱ्या भावाचं बजेट कोलमडलं