हैदराबाद World Day Against Human Trafficking :मानवी तस्करी विरुद्ध जागतिक दिवस 2024 आज जगभरात साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राच्या वतीनं आज 10 वा जागतिक मानवी तस्करी विरुद्ध दिवस साजरा केला जात आहे. या वर्षीची मोहीम बाल तस्करीशी संबंधित कारणं आणि असुरक्षांबद्दल जागरुकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. मानवी तस्करीत बळी पडलेल्या बालकांना हा दिवस समर्पित करण्यात येत आहे. याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखातून जाणून घेऊया.
मानवी तस्करी हा गंभीर गुन्हा :मानवी तस्करी हा एक गुन्हा असून महिला, मुलं आणि पुरुषांकडून जबरदस्तीनं मजुरी घेणं, त्यांच्यावर लैंगिक अत्याचारांसह विविध कारणांसाठी शोषण केलं जाते. यूएन ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम (UNODC) नं जगभरात सुमारे 2, 25,000 तस्करीच्या पीडितांची 2003 पासूनची माहिती गोळा केली. यूएनकडून जागतिक स्तरावरील पीडित शोधून अहवाल सादर करण्यात येत आहे. त्यासह तस्करांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. याबाबतची जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 30 जुलैला जागतिक मानवी तस्करी विरुद्ध दिवस साजरा करण्यात येतो. दरम्यान भारतात दररोज 172 मुली बेपत्ता होतात, तर 170 जणांचं अपहरण करण्यात येते.
मानवी तस्करी म्हणजे काय ? :जागतिक पातळीवर मानवी तस्करांनी मोठा उच्छाद मांडला आहे. त्यामुळे मानवी तस्करी म्हणजे काय याबाबतची माहिती जाणून घेणं क्रमप्राप्त ठरते. मानव तस्करी म्हणजे बळजबरी, फसवणूक किंवा फसवणूक करुन शोषणासाठी लोकांची भरती करणं, त्यांची लपून वाहतूक करणं, त्यांचं दुसरीकडं हस्तांतरण करणं, लपून इतरांकडं आश्रय घेणं. जगातील प्रत्येक प्रदेशात तस्कर फायद्यासाठी महिला, मुली, पुरुष आणि मुलांचं शोषण करतात. तस्कर अनेकदा हिंसा, ब्लॅकमेल, भावनिक, अधिकृत कागदपत्रं काढून टाकणं, फसव्या रोजगार संस्था आणि शिक्षण आणि नोकरीच्या संधींची खोटी आश्वासनं देऊन पीडितांना फसवण्यासाठी आणि जबरदस्ती करण्यासाठी वापरतात.