नवी दिल्ली PM Modi Oath Ceremony :लोकसभा निवडणूक निकाल 2024 लागल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 9 जूनला सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीतील नेत्यांनी पंतप्रधान मोदी 3.0 सरकारच्या स्थापनेसाठी आत्मविश्वास आणि उत्साह व्यक्त केला. भविष्यातील भारताच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यात पंतप्रदान नरेंद्र मोदी हे यशस्वी होतील, असा विश्वास यावेळी एनडीएतील घटक पक्षानं व्यक्त केला.
आगामी 5 वर्षात देश तिसऱ्या क्रमांकाची बनेल अर्थव्यवस्था :नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. यावेळी भाजपाला त्यांच्या सहयोगी पक्षाच्या आधारानं सत्ता स्थापन करावी लागली. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवर काय प्रतिक्रिया देणार याकडं देशाचं लक्ष लागलं होतं. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवर आनंद व्यक्त केला. शपथविधीनंतर ते म्हणाले की, "आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. 50-60 वर्षानंतर देशाला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान लाभला आहे. ही किमया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवली. येत्या 5 वर्षात भारताला सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय आहे. हे ध्येय येत्या 5 वर्षात पूर्ण होऊन देशाचा विकास होईल."
हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण :नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. लोक जनशक्ती पार्टीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात चिराग पासवान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी आपली भावना व्यक्त केली. "हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रम घेऊन पूर्ण करण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावेन," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. "लोक जनशक्ती पार्टीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा विश्वास दाखवला. यावेळी त्यांनी आम्हाला 5 जागा दिल्या आणि त्या सर्व जागा मी जिंकून दाखवल्या आहेत."