लखनऊ : ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात कुंभमेळ्यावरुन परतणारे 3 भाविक ठार झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील हलियापूर परिसरात पूर्वांचल एक्सप्रेसवेवर सोमवारी रात्री 8.40 वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात बिहारमधील सत्येंद्रकांत पांडे, शशिबाला पांडे आणि रिता देवी यांचा जागीच मृत्यू झाला. इतर तीन भाविक गंभीर जखमी झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कुंभमेळ्यावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला :बिहारमधील भाविक कुंभमेळ्यात दर्शन घेतल्यानंतर अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी पूर्वांचल एक्सप्रेसवेवरुन जात होते. यावेळी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर सोमवारी रात्री ही भीषण घटना घडली. भाविकांच्या स्कॉर्पिओ कारला भरधाव ट्रकनं भीषण धडक दिली. या धडकेनं स्कॉर्पिओ कारचा चक्काचूर झाला. त्यामुळे कारमधील सत्येंद्रकांत पांडे, शशिबाला पांडे आणि रिता देवी यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील इतर तीन भाविकही गंभीर जखमी झाले.
रामलल्लाच्या दर्शनाला जाताना घडला अपघात :बिहारमधील हे भाविक आपल्या स्कॉर्पिओ कारनं कुंभमेळ्याला आले. त्यानंतर रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी या भाविकांनी पूर्वांचल एक्सप्रेसवेवरुन पुढील प्रवास सुरू केला. मात्र सुलतानपूरमधील हलियापूर टोल प्लाझा आणि कुरेभार टोल प्लाझासमोर एका भरधाव ट्रकनं कारला धडक दिली. या ट्रकच्या भरधाव वेगामुळे कारचा चक्काचूर झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव :भाविकांच्या कारला ट्रकनं धडक मारल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ जखमी भाविकांना कुरेभर आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी सत्येंद्रकांत पांडे, शशिबाला पांडे आणि रिता देवी यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. कुरेभार पोलीस ठाण्याचे ठाणेदार शरदेंदू द्विवेदी म्हणाले की, "अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत." अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रशासनाकडं ट्रक चालकाला तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
हेही वाचा :
- ट्रक आणि रिक्षाची भीषण धडक; रिक्षामधील 7 मजुरांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर
- रायपूरवरुन कुंभमेळ्याला जाणाऱ्या बसला अपघात; उभ्या ट्रेलरला धडकली बस, वाहक ठार
- स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा भीषण अपघात; सहा ठार, स्कॉर्पिओ चक्काचूर