हैदराबाद Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत (Union Budget 2024) आहेत. आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका लागणार असल्यानं निर्मला सीतारमण या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. असं असलं, तरी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मोरारजी देसाई यांनी दहावेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता. तर माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी तब्बल 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र, दुसरीकडं तीन असे केंद्रीय मंत्री आहेत, ज्यांनी एकदाही अर्थसंकल्प सादर केला नाही. जाणून घेऊ या तीन केंद्रीय अर्थमंत्र्यांविषयीची रंजक कहानी.
क्षितिज चंद्र नियोगी : स्वातंत्र भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून के सी नियोगी यांचं नाव घेतलं जाते. त्यांना भारताचे दुसरे अर्थमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. के सी नियोगी यांनी 1951 मध्ये वित्त आयोगाचे अध्यक्ष होण्यापूर्वी अर्थमंत्री आर के षण्मुखम यांची जागा घेत ते अर्थमंत्री झाले. मात्र, त्यांना केवळ 35 दिवस अर्थमंत्री होता आलं. त्यामुळं त्यांना देशाचा अर्थसंकल्प सादर करता आला नाही. त्यांच्यानंतर 1948 मध्ये त्यांची जागा जॉन मथाई यांनी घेतली. त्यामुळं देशाचे दुसरे अर्थमंत्री असूनही के सी नियोगी यांना अर्थसंकल्प सादर करता आला नाही. अशाप्रकारे के सी नियोगी हे पहिले असे अर्थमंत्री बनले, ज्यांना अर्थसंकल्प सादर करता आला नाही. मात्र देशाचं पहिलं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरुंनी त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं.