हैदराबाद Telangana ACB Raids : तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) एका सरकारी अधिकाऱ्याकडून सुमारे 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलीय. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तेलंगणा स्टेट रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (TSRERA) चे सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी एस बालकृष्ण यांच्याशी संबंधित ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. यापूर्वी त्यांनी हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) मध्ये नगर नियोजन संचालक म्हणून काम केलंय. लाचलुचपत प्रतिबंधक संस्थेच्या 14 पथकांची दिवसभर छापेमारी सुरु होती, ही छापेमारी आजही सुरु होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत 100 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बुधवारी सकाळी 5 वाजेच्या सुमारास 20 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी आजही सुरु राहू शकते. एसीबीच्या पथकांनी एचएमडीए आणि रेरा कार्यालयांची झडती घेतली, तसंच बालकृष्ण यांच्या घरावर आणि तपासाशी संबंधित इतर महत्त्वाच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. बालकृष्ण यांच्या घरावर, कार्यालयांवर, त्यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. यात 100 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आलीय. आतापर्यंत सुमारे 40 लाख रुपये रोख, 2 किलो सोनं, चल-अचल मालमत्तेची कागदपत्रं, 60 महागडी घड्याळं, 14 मोबाईल फोन आणि 10 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.