नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 :लोकसभा निवडणुकीचे दोन महत्वाचे टप्पे आतापर्यंत पार पडले आहेत. मात्र अद्यापही काँग्रेसनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदार संघातून लढण्याबाबत अद्यापही काँग्रेसकडून अधिकृत माहिती पुढं आली नाही. याबाबत विरोधकांकडून टीका होत असताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी महत्वाची माहिती दिली आहे. "काँग्रेस पक्ष निवडणुकीला घाबरत नसून गुरुवारी अमेठी आणि रायबरेली मतदार संघाचे उमेदवार जाहीर करण्यात येतील," असं त्यांनी स्पष्ट केलं. "पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं (CEC) काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना अमेठी आणि रायबरेलीसाठी उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार दिले आहेत," असंही जयराम रमेश यांनी यावेळी सांगितलं.
राहुल गांधी अमेठीतून मैदानात उतरण्याची शक्यता :काँग्रेसनेते राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या मतदार संघातून लोकसभा निवडणूक 2024 लढवत आहेत. मात्र त्यासह ते अमेठी लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरण्याची शक्यता असल्याचं काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं आहे. अमेठी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्या तथा मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का देत विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपानं स्मृती इराणी यांना मैदानात उतरवलं आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनेते राहुल गांधी निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'इंडिया' आघाडीतील त्यांच्या मित्र पक्षांनी राहुल गांधी यांनी अमेठीतून निवडणूक लढवावी असं सूचवलं आहे.