नवी दिल्ली Sonia Gandhi :काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदार संघातून सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी-वड्रा यांना उमेदवारी देण्याचे संकेत सोनिया गांधींनी दिले आहेत. सोनिया गांधी यांनी 14 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधून राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत खासदार राहुल गांधी तसंच मुलगी प्रियांका गांधी-वड्रा यांची देखील उपस्थिती होती.
रायबरेलीच्या मतदारांचे मानले आभार :“वयासह आरोग्याच्या कारणांमुळं 'मी' आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. त्यामुळं मला तुमची प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी मिळणार नाही, पण माझे मन सदैव तुमच्या पाठीशी असेल. मला माहित आहे, तुम्ही नेहमीच माझ्या कुटुंबाची काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे”, असं म्हणत सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या मतदारांचे आभार मानले आहेत.
- प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी? :अनेक दशकांपासून रायबरेलीसह अमेठी मतदारसंघाची धुरा सांभाळणाऱ्या प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचवेळी, राहुल गांधी केरळमधील वायनाड व्यतिरिक्त अमेठीची जागा देखील लढवू शकतात, अशी चर्चा सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे.
स्थानिक नेत्यांमध्ये उत्साह-काँग्रेसचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी 2019 मध्ये अमेठीत पराभव पत्कारावा लागला होता. त्यावेळी सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होत्या. तसंच 2019 ते 2023 पर्यंत प्रियंका गांधीं उत्तर प्रदेशच्या AICC प्रभारी होत्या. त्यामुळं त्यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाल्यानं स्थानिक नेत्यांमध्ये उत्साह आहे. प्रियंका गांधी सध्या 19 फेब्रुवारी रोजी अमेठीमध्ये होणाऱ्या राहुल गांधींच्या मेगा रॅलीच्या तयारीत व्यस्त आहेत. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 16 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात पोहचणार आहे. तसंच 19 फेब्रुवारीला अमेठीमध्ये तर, 20 फेब्रुवारीला रायबरेलीला पोहोचणार आहेत.
प्रियंका गांधींच्या नियमित बैठका : “सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी गेली अनेक दशके अमेठी तसंच रायबरेली मतदारसंघ सांभाळत आहेत. विशेषतः त्यांचा रायबरेलीशी जवळचा संबंध आहे. सोनिया गांधी त्यांच्या मतदारसंघासाठी पुरेसा वेळ देऊ शकल्या नसल्यानं गेल्या पाच वर्षांपासून प्रियंका गाधी या रायबरेली मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. तसंच जिल्हा काँग्रेस समित्यांच्या नियमित बैठका घेत आहेत," असं स्थानिक नेते दीपक सिंग यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं.