जयपूर : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याविरोधात राज्यसबेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावरुन संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोठा गदारोळ सुरू आहे. मात्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जयपूर इथं बोलताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विरोधकांवर मोठा हल्लाबोल केला. देशातील आणि देशाबाहेरील काही शक्तींना भारताची प्रगती झाल्याचं पचत नाही. या शक्ती देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिकांनी प्रत्येक देशविरोधी कारस्थानाला हाणून पाडण्यासाठी एकत्र राहिले पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी टीका केल्यानंतर आता याबाबतचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
देशविरोधी शक्तीला भारताची प्रगती पचत नाही :उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जयपूर इथं बोलताना देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना मोठा चपराक लगावली आहे. "देशातील आणि बाहेरील काही शक्ती भारताची प्रगती पचवू शकत नाहीत. या देशविरोधी शक्ती देशाचं विभाजन करू पाहत आहेत. त्यामुळे प्रत्येक देशविरोधी कटकारस्थानाला हाणून पाडण्यासाठी नागरिकांनी एकत्र रहावं," असं आवाहन त्यांनी केलं. जयपूर इथल्या एका कार्यक्रमात बुधवारी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे विरोधकांना चांगलीच चपराक बसली आहे. "भारत एक मोठी क्षमता असलेला देश आहे, ही बाब निश्चित आहे. देशाचा विकास दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भारताचा उदय कोणालाही थांबवता येणार नाही" असंही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी स्पष्ट केलं.