Prajwal Revanna sex scandal : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेले माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना तसंच नातू प्रज्वल रेवन्ना यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी एसआयटीनं एचडी रेवन्ना तसंच प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्याचवेळी प्रज्वलच्या विरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती सीबीआयला करण्यात आली आहे. एसआयटीनं एचडी रेवन्ना यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यासाठी आज सायंकाळपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
प्रज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी :कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी शनिवारी सांगितलं की, विशेष तपास पथकानं (एसआयटी) होलेनरसीपूरमधील जेडीएस आमदार एचडी रेवन्ना तसंच हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. एसआयटीनं माजी मंत्री एचडी यांना दुसरी नोटीस दिली आहे. त्यांना चौकशीसाठी एसआयटीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
पिता-पुत्राविरुद्ध लैंगिक गुन्हा दाखल :जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे, गेल्या रविवारी हसन जिल्ह्यातील होलेनर्सीपुरा पोलिस ठाण्यात पिता-पुत्र दोघांविरुद्ध लैंगिक छळाचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर रेवन्नाचा विश्वासू सतीश बबन्ना याच्याविरुद्ध म्हैसूरमध्ये गुरुवारी रात्री महिलेच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला लैंगिक शोषणाची बळी असल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बबन्नाला अटक केलीय.
प्रज्वलचं परदेशात पलायन :प्रज्वल रेवन्ना याच्या अटकेबाबत गृहमंत्री जी. परमेश्वरा म्हणाले, 'रेवन्नाला परदेशातून परत यावंच लागेल. आज नाही तर परवा त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल. कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 एप्रिल रोजी प्रज्वल परदेशात पळून गेल्याचा आरोप आहे. त्यांच्या वकिलानं एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी सात दिवसांचा अवधी मागितला असून, तपास पथकानं त्यांना मुदत दिली आहे.