नवी दिल्ली Shiv Sena MLA Disqualification Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ यावर सुनावणी करेल.
काय आहे प्रकरण : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला आपला निकाल दिला होता. राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली. तसेच त्यांनी, कोणतेही पक्ष नेतृत्व राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूची (ज्याला पक्षांतर विरोधी कायदा म्हणून ओळखलं जाते) तरतुदीचा पक्षातील मतभेद किंवा अनुशासनहीनतेसाठी वापर करू शकत नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचं कोणतंही वैध कारण सापडत नाही, असं म्हणत ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाही फेटाळून लावली. या आमदारांना प्रत्यक्ष व्हीप बजावण्यात आला नव्हता, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.