नवी दिल्ली- कल्याणमधील मराठी कुटुंबावर परप्रांतीय असलेल्या सरकारी अधिकाऱ्यानं हल्ला केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. शिवसेनेतील (एकनाथ शिंदे) नेते हे नामर्द आहेत, असा घणाघात केला.
खासदार संजय राऊत म्हणाले, " मुंबईत मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत. ठाणे, डोंबिवलीत मराठी माणूस घालविण्याचे प्रयत्न दिले आहेत. अमित शाह यांनी ज्यांच्याकडे शिवसेना सोपविली आहे, ते नामर्द लोक आहेत. ते सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे नुकसान केले. मराठी माणसाला दुय्यम करण्यासाठी शिवसेना फोडण्यात आली. कालचा कल्याणमधील हल्ल्याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे. दोन्ही मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. मराठी माणूस म्हणून घेताना यांना लाज वाटली पाहिजे. आमच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांचे १०० बाप खाली यावे लागतील. मराठी माणसावरील हल्ले ही भाजपाच्या अंताची सुरुवात आहे. मराठी माणसाला हद्दपार करण्याचा कट आहे. बाहेरून आलेल्यांना आम्ही स्वीकारतो. मांसाहार करणाऱ्यांवर हल्ला केला. मांस खाणे हा गुन्हा आहे का?".
- भाजपा युवा मोर्चात्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला केला. त्यावर खासदार राऊत म्हणाले, " ही सत्तेची मस्ती आहे. अशी मस्ती आणि हुकूमशाही नष्ट होते, अशी इतिहासात दाखले आहेत. आमच्यावर टीका करण्यापूर्वी अवतीभोवती असणाऱ्यांना भ्रष्टाचारांचा बंदोबस्त करा".