नवी दिल्ली Delhi Excise Policy Case :दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के कविता यांना पुन्हा एकदा न्यायालयानं धक्का दिला आहे. राऊस अव्हेन्यू कोर्टानं त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ केली. सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयात सीबीआयनं के कविता यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. ईडी प्रकरणातही त्यांची कोठडी 23 एप्रिलला संपत आहे. त्यानंतर के कविता यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सीबीआयनं 11 एप्रिलला केलं होतं अटक :दिल्ली दारू घोटाळ्यात सीबीआयनं बीआरएस नेत्या के कविता यांना 11 एप्रिलला अटक केली होती. दिल्ली दारू घोटाळ्यात के कविता यांचाही सहभाग असल्याचा आरोप सीबीआयनं केला. या अगोदर के कविता या दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रींग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होत्या. या प्रकरणी सीबीआयनं 6 एप्रिलला के कविता यांची न्यायालयीन कोठडीत चौकशी केली होती. या प्रकरणी 5 एप्रिलला न्यायालयानं सीबीआयला के कविता यांची न्यायालयीन कोठडीत चौकशी करण्याची परवानगी दिली होती. ईडीनं 15 मार्चला हैदराबादमध्ये छापेमारी करत के कविता यांना अटक केली होती.