नवी दिल्ली :केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे. महसूल विभागाचे सचिव संजय मल्होत्रा पुढील आरबीआय गव्हर्नर असणार आहेत. पुढील 3 वर्ष ते या पदावर असणार आहेत. ते विद्यमान आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर असतील.
कोण आहेत संजय मल्होत्रा? :संजय मल्होत्रा हे प्रशासकीय सेवेतेली मोठं नाव आहे. सध्या अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कार्यरत असलेले संजय मल्होत्रा यांना वित्त, कर, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि खाणकाम यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये 33 वर्षांचा अनुभव आहे. संजय मल्होत्रा यांनी त्यांचं अभियांत्रिकीचं शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरमधून पूर्ण केलं. प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी पदव्युतर शिक्षण घेतलं. संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे आणि राजस्थान केडरचे सनदी अधिकारी आहेत. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपदही भूषवलं आहे. मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी क्षेत्राचा मोठा अनुभव आहे.