बेंगळुरु Rameshwaram Cafe Blast Case : राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) शुक्रवारी रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन फरार आरोपींना अटक केलीय. या आरोपींना कोलकाताजवळ अटक करण्यात आलीय. 1 मार्च रोजी बेंगळुरु येथील कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात नऊ जण जखमी झाले होते. एनआयएच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार अदबुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजेब यांचा कोलकाताजवळ शोध घेण्यात आला आणि एनआयएच्या पथकानं त्यांना अटक केली. 12 एप्रिल रोजी सकाळी कोलकाताजवळ फरार आरोपींना शोधण्यात एनआयएला यश आलं. तिथं ते खोटी ओळख दाखवून लपून बसले होते.
10 लाखांचं होतं बक्षीस : गेल्या महिन्यात एनआयएनं 30 वर्षीय ताहा आणि शाजेब यांची छायाचित्रं आणि वर्णन प्रसिद्ध केलं होतं. प्रत्येकावर 10 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. शाजेबनं कॅफेमध्ये आयईडी ठेवली होती तर ताहा हा मास्टरमाईंड असून त्यानं स्फोटाची योजना आखली आणि ती घडवून आणल्याचं एनआयएच्या प्रवक्त्यानं सांगितलंय.
300 हून अधिक सीसीटीव्ही तपासले : एनआयएनं केंद्रीय गुप्तचर संस्था आणि पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळच्या राज्य पोलीस यंत्रणांच्या समन्वयानं काम केलं. 300 हून अधिक कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर 2020 पासून सुरक्षा एजन्सींच्या रडारवर आलेल्या शाजिब आणि ताहा या दोन इसिस कार्यकर्त्यांनी हा स्फोट घडवून आणल्याचं एनआयएनं सांगितलंय.