नवी दिल्ली :Rajya Sabha election 2024 : आज राज्यसभेची निवडणूक झाली. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या 15 जागांसाठी ही निवडणूक झाली. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 जागांवर निवडणूक झाली, त्यामध्ये भाजपाचे 8 उमेदवार विजयी झाले. तर, समाजवादी पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले. या सर्व 10 जागांसाठी 395 मतदारांनी मतदान केलं आहे.
उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार सुधांशू त्रिवेदी, आरपीएन सिंग, चौधरी तेजवीर सिंग, साधना सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत आणि नवीन जैन विजयी झाले आहेत. तर, समाजवादी पक्षाच्या जया बच्चन आणि पीडीएचे उमेदवार रामजीलाल सुमन यांनीही राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. सपाचा तिसरे उमेदवार माजी आयएएस आलोक रंजन यांचा पराभव झाला आहे. येथील समाजवादी पार्टीच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटींग केल्यानं भाजपाच्या उमेदवराचा विजय झाला.
सपा आमदारांचे भाजपला मतदान : उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 जागांवर निवडणूक झाली. या 10 जागांसाठी 399 पैकी 395 आमतदारांनी मतदान केलं. माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्या पत्नी महाराजी देवी मतदानासाठी आल्या नाहीत. तसंच, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. मिळालेल्या माहितीनुसार, सपाच्या 7 आमदारांनी भाजपाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे भाजपाला आठ जागा मिळवण्यात यश आलं आहे.
सपामध्ये मोठा गोंधळ :मंगळवारी राज्यसभेच्या 10 जागांसाठी मतदान सुरू होताच समाजवादी पक्षात गोंधळ झाला. पक्षाचे चीफ व्हिप आणि उंचाहरचे आमदार मनोज पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याशिवाय सपाच्या इतर चार आमदारांनीही जय श्री रामचा नारा देत क्रॉस मतदान केलं. सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाच्या इतर काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं त्यांनी स्वतः मान्य केलं असून आता त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाणार आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसची एकता दिसून आली : कर्नाटकमध्ये भाजपाचे उमेदवार नारायण बंडगे विजयी झाले आहेत. तर, भाजप-जेडी(एस) उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे अजय माकन, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर हे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. अजय माकन 47 मतांनी, नसीर हुसेन 46 मतांनी आणि जीसी चंद्रशेखर 46 मतांनी विजयी झाले आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसची एकता या निवडणुकीत दिसून आली आहे.