पाटणाRailway Recruitment Protest : अलीकडंच, रेल्वे भर्ती बोर्डानं सहाय्यक लोको पायलटसाठी 5 हजार 697 पदांसाठी भरती जाहीर केली होती. 20 जानेवारीपासून भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, या भरतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शनं केल्यामुळं पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. त्यामुळं पोलिसांनी पाटण्यात अडीच हजार अनोळखी व्यक्तींविरोधा गुन्हे दाखल केले आहेत.
रेल्वेत 5 हजार 697 पदांसाठी भरती : रेल्वे भर्ती बोर्डानं सहाय्यक लोको पायलटच्या 5 हजाराहून अधिक पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी 20 जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात झाली आहे. उमेदवारांची निवड CBT चाचणी म्हणजेच संगणकावर आधारित असेल. या पदासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे तसंच कमाल 33 वर्षे ठेवण्यात आलं आहे. मात्र, राखीव प्रवर्गाला वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. नवी अधिसूचना जारी करताना रेल्वेनं वयोमर्यादेत 3 वर्षांची शिथिलता देऊन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
- भरतीला विरोध का ? :रेल्वेनं केवळ 5 हजार 697 पदासाठी जाहिरात काढली आहे. 2018 मध्ये, जेव्हा रेल्वेनं 64 हजार 371 पदांसाठी भरती जाहीर केली होती, तेव्हा 2.5 कोटी फॉर्म आले होते. तेव्हापासून पदभरतीत वाढ करण्यात आलेला नाही. त्यामुळं रेल्वेनं जागा वाढवून द्याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
“सहा वर्षांपासून रेल्वेत भरती झालेली नाही. 2019 पासून फक्त कागदी घोडे नाचवण्यात येत आहे. लाखो उमेदवार मोठया प्रमाणावर रिक्त जागा निघण्याची वाट पाहत होते. मात्र केवळ 5 हजार 697 जागांची पद भरती जाहिरात काढण्यात आली आहे.''- दीपक कुमार, उमेदवार, नवाडा