सूरत Train Derailment Bid :नुकताच सुरत जिल्ह्यातील किम स्टेशनजवळ रेल्वे रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ त्याचा तपास सुरू करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या तपासादरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनीच रेल्वे घसरविण्याचा कट रचल्याचं उघड झालंय. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
प्रमोशनसाठी रचला कट : 21 सप्टेंबर रोजी किम स्टेशनजवळ ट्रॅकवरून फिशप्लेट काढून ट्रेन रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तपासात समोर आलं की, त्यावेळी गस्तीवर असलेल्या आरोपी सुभाष पोद्दारला नोकरीत लवकर बढती मिळवायची होती. त्यामुळं त्यानं हा कट रचला. त्यानं स्वतः फिशप्लेट काढली. चाव्या उघडल्या. त्यानंतर ही माहिती रेल्वेला देण्यात आली. आपल्या सतर्कतेमुळं आपल्याला लवकरच बढती मिळेल असं आरोपीला वाटत होतं.
घटनास्थळी 140 पोलीस : गांभीर्यानं तपास केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. मात्र, या संपूर्ण घटनेबाबत जिल्हा पोलिसांची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. विशेष म्हणजे घटनेच्या दिवसापासून 140 पोलीस घटनास्थळी तैनात होते. आजूबाजूच्या शेतातील झुडपांची तपासणी करण्यात आली. श्वानपथक, एफएसएल आणि ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर या कटात सहभागी असलेले आरोपी पकडले गेल्यानं सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकरणी सुभाष कुमार पोद्दार, मनीष कुमार मिस्त्री, शुभम जयस्वाल या तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार : सूरत ग्रामीण पोलीस प्रमुख हितेश जोयसर म्हणाले, "आरोपी सुभाष हा रेल्वे कर्मचारी आहे. तो गेल्या 9 वर्षांपासून रेल्वेत कार्यरत आहेत. दुसरा आरोपी मनीष हा गेल्या दीड वर्षांपासून काम करत होता. तर तिसरा आरोपी शुभम हा कंत्राटी मजूर असून काही दिवसांपूर्वीच कामावर लागलाय. तिन्ही आरोपी ट्रॅकमन म्हणून ट्रॅकच्या देखभालीची जबाबदारी सांभाळत होते. सुभाषच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आल्याचं तपासादरम्यान समोर आलंय."
हेही वाचा -
- हार्बर मार्गावर लोकल ट्रेन रुळावरून घसरली, पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल सेवा ठप्प - Mumbai Local
- 'या' ट्रिक्स वापरून करा रेल्वेचं तिकीट बुक, वाचणार बक्कळ पैसे - How to Save Money on Train Tickets
- कानात हेडफोन घालून रेल्वे रुळावरून चालणं जीवावर बेतलं; रेल्वेच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू - Mumbai Accident News