पूर्णिया/ कटिहार : राहुल गांधी यांची ''भारत जोडो न्याय यात्रा'' सोमवारी 29 जानेवारीला बिहारमध्ये दाखल झाली. आज, मंगळवार बिहारमध्ये या यात्रेचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी किशनगंज आणि अररिया या भागातून ही यात्रा गेली. आज ती पूर्णियाला पोहोचणार आहे. राहुल गांधी पूर्णिया येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्णियाला पोहोचले आहेत. यानंतर न्याय यात्रा कटिहार येथे पोहोचेल. रात्रीचा मुक्काम कटिहारमध्येचं असणार आहे.
बंगालमार्गे बिहारमध्ये प्रवेश : सोमवारी ही यात्रा बंगालमार्गे सकाळी 9.30 वाजता किशनगंजला पोहोचली. तिथून संध्याकाळी अररियाला पोहोचली. दोन्ही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात या यात्रेचं स्वागत केलं. त्यानंतर आता ही यात्रा बिहारमध्ये पोहचली असून राहुल गांधी यांची पूर्णियामध्ये जाहीर सभा होत आहे. त्याबाबत प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. यात्रा, मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही निमंत्रित केलं होतं. परंतु, त्याआधीच नितीश कुमार इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये सहभागी झाले आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षही येणार : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील पूर्णियात होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सकाळी 9.30 वाजता ते विमानाने पाटण्याला पोहोचतील तेथून ते हेलिकॉप्टरने पूर्णियाला निघणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. सोमवारी आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी अद्याप नितीशकुमार यांच्यावर भाष्य केलेलं नाही. पूर्णिया येथील सभेत नितीश कुमारांच्या मुद्द्यावर राहुल गांधी काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुन्हा बंगालमध्ये दाखल : काँग्रेस नेते राहुल गांधी आज मंगळवारी जिल्ह्यातील कोडा पोलीस स्टेशन परिसरात पोहोचणार आहेत. यावेळी प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. जिल्हा दंडाधिकारी रवी प्रकाश यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या पथकाने खेरिया, दिघरीचा आढावा घेतला. गांधी यांचा ताफा दिघरी पोलीस स्टेशन परिसरात रात्रभर विश्रांती घेईल. त्यानंतर ही यात्रा जिल्ह्यातील रोशना ओपी यांच्या मदतीने पुन्हा पश्चिम बंगालमध्ये दाखल होईल. -जितेंद्र कुमार, पोलीस अधीक्षक