नवी दिल्ली Rahul Gandhi on Doctor Rape Murder Case :विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. 'एक्स' पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटलं की, पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळं रुग्णालय तसंच स्थानिक प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत."
'मी पीडितेच्या कुटुंबासोबत':राहुल गांधींनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले,"या घटनेनं विचार करायला भाग पाडलंय. मेडिकल कॉलेजसारख्या ठिकाणी डॉक्टरच सुरक्षित नसतील, तर पालकांनी कोणत्या आधारावर आपल्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं? निर्भया प्रकरणानंतर आणलेले कठोर कायदेही असे गुन्हे रोखण्यात कशामुळे अपयशी ठरतात?" राहुल गांधींनी हाथरस, उन्नाव आणि कठुआ येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणांचा पोस्टमध्ये उल्लेख केला. ते म्हणाले, "हाथरसपासून उन्नावपर्यंत आणि कठुआपासून कोलकातापर्यंत महिलांवरील वाढत्या घटनांवर, प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक घटकाला एकत्र येऊन गंभीरपणे चर्चा करावी लागेल. याबाबत ठोस उपाययोजना कराव्या लागतील. मी पीडित कुटुंबाबाबत संवेदना व्यक्त करतोय. तसंच पीडित कुटुंबाच्या पाठीमागं मी ठामपणे उभा आहे."