नवी दिल्ली :संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 सुरू असून विरोधकांनी गौतम अदानी यांचं कथित लाच प्रकरण आणि ईव्हीएम मशीनवरुन सभागृहात एल्गार पुकारला आहे. आजही संसदेत विरोधक जोरदार राडा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडं आज कर्नाटकातील वायनाड या मतदार संघातील पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा आणि नांदेड लोकसभा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले रवींद्र वसंतराव चव्हाण हे आड खासदारकीची शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणूक 2024 च्या बरोबरच नांदेड इथं लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक घेण्यात आली.
प्रियंका गांधी वाड्रा यांचा वायनाड मतदार संघात विजय :वायनाड लोकसभा मतदार संघात प्रियंका गांधी वाड्रा यांनी सीपीआयच्या सत्यन मोकेरी यांचा 4 लाख 10 हजार मतांनी पराभव केला. या मतदार संघात भाजपाच्या नव्या हरिदास या देखील मैदानात होत्या. मात्र त्यांना केवळ 1 लाख 9 हजार मतं मिळाल्यानं त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. प्रियांका वाड्रा यांना राहुल गांधी यांचा विक्रम मोडता आला नाही. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सीपीआय (एम) च्या पीपी सुनीर यांचा 4 लाख 31 हजार मतांनी पराभव केला. दुसरीकडं नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी भाजपाच्या संतुक हंबर्डे यांचा 1457 मतांनी पराभव केला. अटीतटीच्या लढतीत रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या उमेदवाराला धूळ चारली.