नवी दिल्ली :लोकसभेत आज (मंगळवार) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान आपलं मत व्यक्त केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावर सडकून टीका केली. काँग्रेस अग्निवीर योजनेवरही खोटारडेपणा पसरवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, मला काही लोकांची अस्वस्थता समजते. विशेषत: ज्यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव झाला आहे त्यांची. जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीत जनतेनं आम्हाला पुन्हा सेवेची संधी दिली. आमच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात गरिबांच्या हितासाठी काम केलं. सबका साथ सबका विकास हे धोरण पुढं नेण्यात आलं आहे, असं मोदी म्हणाले.
हिंदूंवर खोटे आरोप करण्याचं कारस्थान :131 वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये म्हटलं होतं की, "ज्या धर्मानं सहिष्णुता शिकवली त्या धर्मातून मी आलो आहे. याचा मला अभिमान आहे". हिंदूंवर खोटे आरोप करण्याचं कारस्थान रचणं ही गंभीर बाब असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. हिंदू हिंसक आहेत, असं म्हणणं ही तुमची संस्कृती आहे. हा देश हे कधीही विसरणार नाही, असं त्यांनी म्हटलं.
तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही : लोकसभेतील भाषणादरम्यान मोदींनी परीक्षा, पेपरफुटीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. या अनियमितता रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तरूणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. त्या प्रकरणातील दोषींनाही अटक करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
सैन्य भरतीबाबत खोटं पसरवू नये : “माझ्या देशातील तरुणांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती होऊ नये, म्हणून सैन्य भरतीबाबत खोटं बोललं जात आहे. इंदिरा गांधींनी वन रँक वन पेन्शन पद्धत रद्द केली होती. काँग्रेसने ती वर्षानुवर्षे लागू होऊ दिली नाही. एनडीए सरकारनं त्याची अंमलबजावणी केली", असं मोदी म्हणाले.