नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या देशाला संबोधित करताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. यावेळी पंतप्रधान मोदींनी ॲनिमेशन क्षेत्रात भारताच्या वाढत्या क्षमतेचा उल्लेख केला. तसंच डिजिटल अरेस्ट फ्रॉड टाळण्यासाठी काय करावं , याची माहिती मोदींनी यावेळी दिली.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी? : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'ॲनिमेशन आणि गेमिंगच्या क्षेत्रात भारत नवीन क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. छोटा भीमप्रमाणेच आमच्या इतर ॲनिमेटेड सिरिज कृष्णा, मोटू-पतलू, बाल हनुमान यांचेही जगभरात चाहते आहेत. भारतीय ॲनिमेटेड पात्रं आणि चित्रपट त्यांच्या आशय आणि सर्जनशीलतेमुळं जगभरात पसंत केले जात आहेत. भारत ॲनिमेशनच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या मार्गावर असून भारतातील गेमिंग स्पेसही वेगानं वाढत आहे. आज ॲनिमेशन क्षेत्रानं उद्योगाचं रूप धारण केलंय. 28 ऑक्टोबर रोजी 'जागतिक ॲनिमेशन दिन' साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताला जागतिक ॲनिमेशन पॉवरहाऊस बनवण्याचा संकल्प आपण करुया."
विविध क्षेत्रात भारत 'आत्मनिर्भर' :"आता आत्मनिर्भर भारत अभियान हे एक जनआंदोलन बनत चाललंय. या महिन्यात आम्ही आशियातील सर्वात मोठ्या 'इमेजिंग टेलिस्कोप MACE' चे हानले, लडाख येथे उद्घाटन केलं. अगदी 10 वर्षांपूर्वी भारतात काही क्लिष्ट तंत्रज्ञान विकसित होत आहे, असं कोणी म्हटलं तर अनेकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. पण आज तेच लोक देशाचं यश पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. विविध क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत आहे. एकेकाळी मोबाईल फोन आयात करणारा भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनलाय. एकेकाळी संरक्षण उपकरणांचा सर्वात मोठा खरेदीदार असलेला भारत आज 85 देशांमध्ये शस्त्रास्त्रे निर्यात करत आहे. अंतराळ तंत्रज्ञानामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिला देश ठरलाय", असंही पंतप्रधान म्हणाले.
डिजिटल अरेस्ट फ्रॉड टाळण्यासाठी काय करावं? :पुढं ते म्हणाले, "डिजिटल अरेस्ट फ्रॉड अंतर्गत कॉल करणारे आरोपी आपण पोलीस, सीबीआय, आरबीआय किंवा अंमली पदार्थ अधिकारी असल्याचं भासवतात. तसंच ते इतक्या विश्वासानं आपल्याशी बोलतात की आपल्यालाही त्यांचं बोलणं खरं वाटायला लागतं. त्यामुळं हे समजून घेणं गरजेचं आहे की, पहिल्या टप्प्यात फसवणूक करणारे तुमची वैयक्तिक माहिती घेतात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं. तर तिसऱ्या टप्प्यात तुमच्यावर वेळेचा दबाव निर्माण केला जातो. पण तुम्हाला कधी असा फोन आला तर घाबरू नका. तुम्हाला माहित असलं पाहिजे की कोणतीही तपास यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलवर अशी चौकशी करत नाही. शक्य असल्यास, स्क्रीनशॉट घ्या. समोरील व्यक्ती काय बोलत आहे, हे रेकॉर्ड करा."
हेही वाचा -
- पंतप्रधान मोदींना मेळघाटची भुरळ; 'मन की बात'मध्ये चंद्रपुरातील वाघांचाही केला उल्लेख