नवी दिल्ली : भाजपाच्या दोन खासदारांना धक्काबुक्की केल्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या प्रकरणावरुन आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभा हे दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आले. या गदारोळातचं सभागृहाचं सूप वाजलं. दरम्यान राज्यसभा तहकूब होण्याअगोदर सभापतींनी 12 राज्यसभेच्या खासदारांची वन नेशन वन इलेक्शन बाबतच्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं :संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं आहे. आज सकाळीचं काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षातील खासदारांनी मोठा आक्रमक पवित्रा घेतला. संसदेच्या दारात गुरुवारी झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे काँग्रेस आणि मित्रपक्षातील खासदारांनी आक्रमक होत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज चालवणं कठिण झालं. विरोधकांचा गदारोळ सुरुच असल्यामुळे राज्यसभा आणि लोकसभा तहकूब करुन हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजल्याचं जाहीर करण्यात आलं.
राज्यसभा खासदारांची संयुक्त संसदीय समितीवर नियुक्ती :केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन विधेयक मंजूर केल्यानंतर हे विधेयक संसदेत मांडण्यात आलं. या प्रकरणी सभागृहात संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभेत अगोदरचं खासदारांची संयुक्त संसदीय समितीत निवड करण्यात आली. आज राज्यसभेच्या खासदारांचीही या समितीत नियुक्ती करण्यात आली. या समितीत राज्यसभेचे घनश्याम तिवारी, भुवनेश्वर कलिता, के. लक्ष्मण, कविता पाटीदार, संजय कुमार झा, रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक, साकेत गोखले, पी. विल्सन, संजय सिंह, मानस रंजन मंगराज आणि व्ही. विजयसाई रेड्डी यांचा समावेश आहे.
सत्ताधाऱ्यांचा विरोधकांवर हल्लाबोल :संसदेत विरोधकांनी गोंधळ केल्यानंतर सत्ताधारी भाजपा खासदारांनी त्यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. याबाबत बोलताना जगदंबिका पाल यांनी सांगितलं, की "काल काँग्रेस खासदारांनी संसदेच्या गेटवर गुंडगिरी आणि हिंसाचार केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आमच्या प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत या दोन खासदारांना धक्का दिला. लोकशाहीत हिंसेला जागा आहे का?," असा सवाल त्यांनी केला. भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांनीही विरोधकांना दारेवर धरलं "गुरुवारी संसदेत जे काही घडलं ते घडायला नको होतं. आम्ही या धक्काबुक्कीचा तीव्र निषेध करतो. ज्येष्ठ खासदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. आपण सर्वांनीच संसदेची प्रतिष्ठा राखली पाहिजे. राहुल गांधी यांचे विधान हे अत्यंत दुर्दैवी आहे."
हेही वाचा :
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024: भाजपा खासदारांना धक्काबुक्की करणं पडलं महागात; राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल
- संसदेच्या प्रांगणात धक्काबुक्की, भाजपाचे 2 खासदार रुग्णालयात; राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024: अमित शाहांविरोधात विरोधकांचं जोरदार आंदोलन; राहुल गांधींंच्या धक्क्यानं भाजपा खासदार जखमी झाल्याचा आरोप