महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : आजपासून अधिवेशनाला सुरुवात; राज्यसभा दिवसभर, तर लोकसभा बुधवारपर्यंत तहकूब - PARLIAMENT WINTER SESSION 2024

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2024 ला सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनात कथित अदानी लाच प्रकरण, वक्फ बिल आणि धगधगत्या मणिपूरवरुन रणकंदन होण्याची शक्यता आहे.

PARLIAMENT WINTER SESSION 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2024, 9:40 AM IST

Updated : Nov 25, 2024, 1:03 PM IST

नवी दिल्ली :संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2024 ला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे संसद भवनात आजपासून सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये खडाजंगी रंगत आहे. अदानी प्रकरणावरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर वक्फ बिलावरुन सत्ताधारी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2024 च्या रणसंग्रामाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महायुतीनं मारलेली मुसंडी आणि काँग्रेसचा झालेला दारूण पराभव, याचे पडसादही संसदेत उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं राज्यसभा दिवसभर तर लोकसभा बुधवार 27 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

कथित अदानी लाच प्रकरणावर गोंधळाची शक्यता :संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2024 च्या रणसंग्रामाला आजपासून सुरुवात होणार आहे. गौतम अदानी यांच्या विदेशातील कथित लाच प्रकरणाच्या आरोपावरुन संसदेत मोठा गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी अदानी समूहाच्या कथित लाच प्रकरणावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. गौतम अदानी यांच्या कथित लाच प्रकरणावर जेपीसी नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

जनतेनं नाकारलेले मुठभर लोकं . . . पंतप्रधानांचा हल्लाबोल :आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "जनतेनं नाकारलेले काही लोक गुंडागर्दीच्या माध्यमातून संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा सतत प्रयत्न करतात. देशातील जनता त्यांच्या सर्व कृत्यांची मोजदाद करुन वेळ आल्यावर त्यांना शिक्षाही देते. मात्र वेदनादायक गोष्ट म्हणजे नवे खासदार नवीन विचार, नवी ऊर्जा घेऊन येतात. ते कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्व पक्षांचे असतात. त्यांना बोलण्याची संधीही मिळत नाही. दुसरीकडं ज्यांना जनतेनं नाकारलं, त्यांना ना लोकशाहीच्या भावनेचा आदर आहे, ना जनतेच्या आकांक्षांचं महत्त्व आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जबाबदारी समजू शकत नाहीत. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा कधीच पूर्ण करु शकत नाहीत."

राज्यसभा दिवसभर तर लोकसभा दुपारपर्यंत तहकूब :आज सकाळी राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. आझाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी, "संबळमधील हिंसाचार हा एक मोठा मुद्दा आहे. संबळमध्ये 4 जणांनी आपला प्राण गमवला आहे. हा मुद्दा संसदेत मांडला गेला पाहिजे. हिंसाचार हा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही, मी कधीच हिंसाचाराचं समर्थन करत नाही. मात्र या घटनेची चौकशी झाली पाहिजे. संबळ हिंसाचार हे पोलीस, प्रशासन आणि सरकारचं अपयश आहे," अशी तोफ त्यांनी डागली. पहिल्यास दिवशी विरोधक आक्रमक झाल्यामुळे लोकसभा बुधवारपर्यंत तर राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

हेही वाचा :

  1. "देशात फक्त बाबासाहेबांचंच संविधान चालणार"; निकालानंतर पंतप्रधान मोदींनी दिला 'एक है तो सेफ है' चा नारा
  2. "मोदींच्या मदतीने देशाला लुटणाऱ्या अदानींच्या अटकेची राहुल गांधींची मागणी योग्यच", नाना पटोले कडाडले
  3. महाराष्ट्रातील 7 लाख कोटी किमतीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले-राहुल गांधी
Last Updated : Nov 25, 2024, 1:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details