नवी दिल्ली :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एनडीए आणि 'इंडिया' आघाडीच्या खासदारात मोठी धक्काबुक्की झाली. यावेळी राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या धक्काबुक्कीत भाजपाचे दोन खासदार जखमी झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अगोदर पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते. मात्र आता दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडं वर्ग केलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा भाजपा खासदारांचा आरोप :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक खासदरांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात तक्रारी नोंदवल्या. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दोन्ही प्रकरणं गुन्हे शाखेकडं वर्ग केली आहेत. भाजपानं दाखल केलेल्या तक्रारीच्या प्रकरणी पोलिसांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला.
राहुल गांधी यांचा विरोधकांवर हल्लाबोल :लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मोदी सरकारनं संविधानावर अक्रमण केलं आहे. भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची गंभीर चूक केली, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.
भाजपा खासदार प्रताप सारंगी, मुकेश राजपूत जखमी :संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 मध्ये विरोधकांनी अमित शाह यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यावर आंदोलन केलं. विरोधकांच्या आंदोलनावर सत्ताधारी खासदारही आक्रमक झाले. यावेळी खासदारामध्ये संसदेच्या दरवाजामध्ये धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत भाजपा खासदार प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत हे दोघं गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या जखमी खासदारांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : राहुल गांधी प्रकरणावरुन विरोधक आक्रमक, सत्ताधाऱ्यांचं जोरदार प्रत्युत्तर; अधिवेशनाचं 'सूप' वाजलं
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024: अमित शाहांविरोधात विरोधकांचं जोरदार आंदोलन; राहुल गांधींंच्या धक्क्यानं भाजपा खासदार जखमी झाल्याचा आरोप
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024: भाजपा खासदारांना धक्काबुक्की करणं पडलं महागात; राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल