हैदराबाद Subhash Palekar Warns :भविष्यात नैसर्गिक शेतीचं संरक्षण न केल्यास अन्नधान्यावरुन युद्ध होईल, असा इशारा पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी दिला. मंगळवारी फिल्मनगर कल्चरल सेंटरमध्ये आयोजित परिषदेत पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. जागतिक पातळीवर अन्न सुरक्षेचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेच्या भवितव्याबद्दल पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी हा इशारा दिला. नैसर्गिक शेतीचं तातडीनं संरक्षण गरजेचं आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पद्मश्री सुभाष पाळेकर हे त्यांच्या शाश्वत शेतीसाठी करण्यात आलेल्या झिरो बजेट शेतीच्या प्रयोगासाठी सुप्रसिद्ध आहेत.
आधुनिक कृषी पद्धती आणि पर्यावरणाचा ऱ्हास :पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी शाश्वत शेतीसाठी झिरो बजेट शेतीचा प्रयोग केला आहे. या प्रयोगातून त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडं वळवलं आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी आधुनिक कृषी पद्धती आणि पर्यावरणाचा ऱ्हासच्या गंभीर परिणामांवर यावेळी आपलं मत व्यक्त केलं. "आधुनिक ट्रेंडमुळे कृषी उत्पन्नात घट होत आहे. नैसर्गिक संसाधनांच्या अविचारी नाशामुळे हवामानाच्या बदलात लक्षणीय वाढ होत आहे. हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस आणि विनाशकारी पुरांचा फटका शेतीला बसतो. त्यामुळे शेतीतून निघणाऱ्या उत्पादनाला आणखी धोका निर्माण होत आहे."