नवी दिल्ली NEET Paper Leak Case : नीट पेपर लिक प्रकरणात लातूरच्या दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अटक केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणाचे धागेदोरे देशपातळीवर असल्यानं देशभरात सीबीआयच्या वतीनं छापेमारी सुरू आहे. आता नीट परीक्षेचे पेपर सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) नं हे व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) नं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केलं. लीक झालेल्या पेपरचे फोटो दाखवणारे व्हिडिओ बनावट आणि फेरफार करण्यात आलेले आहेत, असं एनटीएच्या वतीनं न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं.
एनटीएनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं शपथपत्र :सर्वोच्च न्यायालयानं नीट प्रकरणावरुन केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) वर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर एनटीएला खडबडून जाग आली. एनटीएनं याबाबत सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केलं. सोशल माध्यमांवर व्हायरल झालेले पेपर हे बनावट आणि फेरफार करण्यात आलेले आहेत, असा दावा एनटीएनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या या शपथपत्रात केला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं ( NTA ) नं राष्ट्रीय, राज्य आणि शहर स्तरावर आणि केंद्र स्तरावर NEET UG 2024 मध्ये उमेदवारांच्या गुणांच्या वितरणाचं विश्लेषण केलं आहे. यातून गुणांचं वितरण अगदी सामान्य असून त्यात गुणांवर परिणाम करणारे कोणतेही बाह्य घटक नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
केंद्र सरकारनं दाखल केलं शपथपत्र :नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता याची पाळंमुळं देशपातळीवर रुजली आहेत, असं स्पष्ट झालं. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवण्यात आला. सीबीआयनं देशभरात छापेमारी करत अनेक आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि एनटीएवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे आता केंद्र सरकारही अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. केंद्र सरकारनं नीट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केलं. यात केंद्र सरकारनं नीट प्रकरणात कोणतीही मालप्रॅक्टीस झाली नसल्याचं स्पष्ट केलं. "इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासनं याबाबत डेटा विश्लेषण केलं. त्यावरुन नीट पेपर लिक प्रकरणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट होत नसल्याचं नमूद केलं आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून चार फेऱ्यांमध्ये समुपदेशन केलं जाईल. कोणत्याही उमेदवारासाठी, कोणत्याही गैरव्यवहाराचा लाभार्थी असल्याचं आढळल्यास, अशा व्यक्तीची उमेदवारी समुपदेशन प्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतरही कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल," असं केंद्र सरकारनं आपल्या शपथपत्रात नमूद केलं आहे.
हेही वाचा :
- नीट पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; लातूरमधून आणखी एकाला अटक - NEET Paper Leak
- 'NEET-UG 2024' पेपर लीक झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट; सरकारवर प्रश्नांची सरबत्ती - NEET UG 2024 Paper Leaked
- NEET घोटाळ्यातील मास्टरमाईंड लातुरातील शिक्षकाच्या संपर्कात; 'गंगाधर'ला ताब्यात घेण्यासाठी लातूर पोलीस बंगळुरूत - NEET Exam Scam Case