नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी आता अत्युच्च शिखरावर पोहोचली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे. आता अशातच काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात महाविकास आघाडीला राज्यातील 288 पैकी 150 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्वेक्षणात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं येऊ शकते, असंही नमूद करण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील :महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. मात्र महाविकास आघाडीनं निवढणुकीपूर्व केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातून त्यांना 150 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि गुजरातला उद्योग पळवणं याचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. त्यासह शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना फोडण्याचा फटका महायुतीला बसणार असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना फोडल्याचा फटका भाजपावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लोकभावना महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता या सर्वेक्षणात नमूद करण्यात आली आहे.
काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून येऊ शकतो उदयास : काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे निरीक्षक टी एस सिंह देव यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितलं की, "महाविकास आघाडी 150 जागा जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेस हा महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ण्हणून उदयास येऊ शकतो. मात्र काँग्रेसचे मित्रपक्ष कशी कामगिरी करतात, यावर सगळं अवलंबून आहे. काँग्रेस पक्षानं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात काँग्रेस 102 पैकी 50 किंवा 60 जागा, उबाठा 95 पैकी 50 जागा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 85 पैकी 50 जिंकण्याची शक्यता आहे. तर उर्वरित काँग्रेसच्या मित्रपक्ष लढवत असलेल्या 7 जागांपैकी 3 ते 4 जिंकेल," असं त्यांनी स्पष्ट केलं.