छत्तीसगड : नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अबुझमाडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत जवळपास 36 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. बस्तरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "चकमकीत 36 नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांसोबतची चकमक अबुझमाड येथे झाली. हा परिसर नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातील सीमा भागात येतो. ज्या भागात चकमक झाली तो संपूर्ण परिसर घनदाट जंगलानं वेढलेला आहे."
मुख्यमंत्र्यांनी जवानांचं केलं कौतुक :पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजता चकमक सुरू झाली. या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक आणि 'एसटीएफ'ची टीम सहभागी होती. या यशस्वी चकमकीबद्दल मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी जवानांचं अभिनंदन केलंय.
आतापर्यंतचं सर्वात मोठं यश : अबुझमाडच्या जंगलात नक्षलवाद्यांची बैठक सुरू असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलानं परिसराची नाकेबंदी सुरू केली. अतिरिक्त एसपी आरके बर्मन यांनी 36 नक्षलवाद्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. अतिरिक्त एसपींनी सांगितले की, "चकमकीच्या ठिकाणाहून 36 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत." अतिरिक्त एसपींनी हे आतापर्यंतचं सर्वात मोठं यश असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा वाढू शकतो, असं मानलं जात आहे. तसंच अनेक नक्षलवादी गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.